बीड/अंबाजोगाई, दि. 5 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात महिला आणि मुली असुरक्षीतच असल्याचे पहायला मिळत आहे. बीडमध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता अंबाजोगाईतही एका सहा वर्षीय मुलीवर वृध्दाने बलात्कार केला आहे. तर बलात्काराची दुसरी घटना बीडमध्ये घडली आहे. एका विवाहितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून 60 वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना समोर आली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या वृद्धाला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. पिडीत अल्पवयीन बालिका अंबाजोगाई येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.02) शाळेतून गावाकडे घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसर्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की, गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत खेळत असताना विष्णू बाबुराव सादुळे (वय 60) हा तिथे आला. चल तुला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तो तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे नराधम विष्णूने त्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितल्यास मारून टाकीन अशी धमकी दिली. सुरुवातीस इभ्रतीच्या भीतीने चिमुकलीच्या मातापित्यांनी कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, ग्रामस्थांनी धीर दिल्यानंतर त्यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून विष्णू सादुळे याच्यावर पोक्सोसह कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्काराची दुसरी घटना बीडमध्ये घडली आहे. मोबाईल दुरूस्तीच्यावेळी अनलॉक करत त्यातुन डाटा काढुन घेतला, यामध्ये सदर महिलेचा पतीसोबतचा एक अश्लिल व्हिडीओ होता. त्याच व्हिडीओच्या आधारे संबंधीत महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडला. त्याचबरोबर संबंधीत आरोपीच्या भावानेही विवाहीतेचा विनयभंग करून अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून दोघांविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीड शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एका 26 वर्षीय विवाहीतेने मोबाईल दुरूस्तीसाठी दिला होता. त्यावेळी दुकानदाराने मोबाईल अनलॉक करून त्यातील डाटा पाहिला असता त्यामध्ये सदर महिलेचा पतीसोबतचा एक अश्लिल व्हिडीओ दिसुन आला. तोच व्हिडीओ दाखवुन मोबाईल दुरूस्ती करणार्याने महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर 20 मार्च 2021 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत अत्याचार केले व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर त्याच आरोपीच्या भावाने पिडित महिलेकडे शरिरसुखाची मागणी करून विनयभंग करत अत्याचाराचा प्रयत्न केला. यानंतर मात्र पिडितेने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली. या प्रकरणी कमलेश काकासाहेब सांगळे, ऋषीकेश काकासाहेब सांगळे या दोघांविरूध्द कलम 376, 376 (2) (एन), 354 (अ),323, 506, 34 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि अंतरप करीत आहेत.
वृध्द आरोपीला तात्काळ ठोकल्या बेड्या
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बर्दापूर पोलिसांनी आरोपी विष्णू सादुळे याला तातडीने बेड्या ठोकल्या. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील तपास पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शिंगाडे करत आहेत.
बीड बसस्थानकातून एका महिलेला
उद्यानात नेवून रिक्षा चालकाने केला विनयभंग
पतीसोबत झालेल्या वादानंतर सिरसाळा येथील एक महिला आपल्या माहेरी नगर येथे जात होती, याअनुषंगानेच शनिवारी सायंकाळी ती बीड बसस्थानकात उतरली होती, यावेळी संतोष नावाची एक व्यक्ती तिच्या जवळ येवून चला तुम्हाला तुमच्या नवर्याकडे सोडतो असे सांगून त्या महिलेस संतोषने त्यांना बीडमधील यशवंतराव चव्हाण चमन उद्यानात आणले, याठिकाणी सदर आरोपीने त्या महिलेसोबत झटापटी केली. तसेच त्या महिलेचा तो मोबाईल घेवूनही फरार झाला. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
