कडा/ वार्ताहर
आष्टी-नगर रोडवरील कासारी शिवारात रस्त्यावर दगड आडवा लावून अज्ञात तीन इसमांनी वाटमारी करीत रोख रक्कम, मोबाइल व दुचाकी पळविल्याची घटना २१ फेब्रुवारीच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी आष्टी पोलिस ठाण्यात तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील हातोला येथील शांतीलाल देवराव गर्जे हे आष्टी-नगर रोडने (एम.एच-१६, ए.यू. ०३५७) असा क्रमांक असलेल्या दुचाकीवरून नगरला जात असताना रस्त्यावर दगड आडवा लावून अज्ञात तीन इसमांनी त्यांना अडविले. व दमबाजी करुन त्यांच्या जवळील मोबाइल काढून डीसीसी बँकेचे दोन एटीएम, पॅनकार्ड, आधार कार्ड व खिशातील अडीच हजार रुपये असा ऐवजही काढून घेऊन सोबत दुचाकी ही पळवून नेली. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात शांतीलाल गर्जे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे करीत आहेत.
——–%%——–
वाहन चोरींच्या घटनेत वाढ
मागील काही दिवसांपासून आष्टीसह कडा परिसरात वाटमारी, लूट तसेच वाहन चोरुन नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे नागरिक, वाहनधारकांमध्ये दहशत निर्माण झाली. त्यामुळे चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.
———–%%——
