बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : ‘भुजसाक्षरतेला बीडच्या जीएसडीए कार्यालयाकडून गती देण्याचे काम केले जात आहे, त्याअनुषंगानेच काल बीड शहरातील एका हॉटेलमध्ये एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, मी जोपर्यंत जमीनीत पाणी मुरवणार नाही तोपर्यंत ते उपसण्याचा मला नैतिक अधिकार नाही’ असा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी केले, तसेच पाणी उपलब्धतेचे महत्व पटवून देवून जिल्ह्यात आणि या जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये आर्थिक क्रांती आणू असे प्रदिपादन यावेळी भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या महाराष्ट्र राज्याचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी केले तर वेगवेगळ्या कामातून या बीड जिल्ह्याला सुभलाम् सुफलाम् करणार असल्याचा विश्वास यावेळी सीईओ अजित पवार यांनी बोलून दाखविला.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, औरंगाबाद विभागामार्फत जलविज्ञान प्रकल्प अंतर्गत वरिष्ठ भुवैज्ञानिक बीड कार्यालयाच्या वतीने ‘जलसाक्षरता’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या महाराष्ट्र राज्याचे आयुक्त चिंतामणी जोशी, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, सीईओ अजित पवार, बीड जिल्हा मनरेगाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. प्रियंका पाटील, भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा औरंगाबादचे विभागाचे उपसंचालक बी.एस.मेश्राम, एम.पी. सुरडकर, औरंगाबाद विभागाच्या वरिष्ठ भुवैज्ञानिक डॉ. विजयंता सोलंकी, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या बीड जिल्हा कार्यालयाचे प्रमुख वरिष्ठ भुवैज्ञानिक रोहन पवार, औरंगाबाद विभागातील भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सर्व वरिष्ठ भुवैज्ञानिक तसेच मानवलोक संस्थेचे अनिकेत लोहिया, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक शिवलेश्वर मेदने, सरपंच, जिल्हास्तरीय अधिकारी तसेच आदी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले व जलप्रतिज्ञा घेण्यात आली व कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर उपसंचालक बी.एस. मेश्राम यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यानंतर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी मार्गदर्शनपर संबोधन करून जलप्रतिज्ञेत समाविष्ट असलेले ‘मी जोपर्यंत जमीनीत पाणी मुरवणार नाही तोपर्यंत ते उपसण्याचा मला नैतिक अधिकार नाही’ हे घोषवाक्य अंगीकारण्याचा निश्चय करण्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर सीईओ अजित पवार यांनी मार्गदर्शनपर संबोधन केले. त्यानंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या महाराष्ट्र राज्याचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी मार्गदर्शनपर संबोधन केले. तसेच मानवलोकचे अनिकेत लोहिया यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. वरिष्ठ भुवैज्ञानिक रोहन पवार यांनी स्त्रोत बळकटीकरण उपाययोजना बाबत विस्तृत विवेचन केले व जलसंवर्धानचे महत्व व पध्दतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांबाबत देखील यावेळी त्यांनी माहिती देवून त्याचे महत्व पटवून सांगितले. तसेच भुजल पुनर्भरन उपाययोजनांबाबत देखील मार्गदर्शन केले. त्यानंतर बीड जिल्हा नरेगाच्या उपाजिल्हाधिकारी डॉ. प्रियंका पाटील यांनी मनरेगा योजनांतर्गत मार्गदर्शन करून विस्तृत योजना समजावून सांगून जास्तीत जास्त पध्दतीने त्यांना अंमलबजावणीचे महत्व विषद केले. कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ भुवैज्ञानिक रोहन पवार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वरिष्ठ भुवैज्ञानिक डॉ. व्ही.व्ही. सोलंकी यांनी केले.
बीडच्या ‘जीएसडीए’ कार्यालयाकडून ‘भुजल साक्षरतेला’ गती, जमीनीत पाणी मुरवण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा – जिल्हाधिकारी, पाणी उपलब्धतेचे महत्व पटवून देवून जिल्ह्यात आर्थिक क्रांती आणू – आयुक्त चिंतामणी जोशी, बीड जिल्ह्याला सुभलाम् सुफलाम् करणार – सीईओ अजित पवार
