Site icon लोकाशा-बंब न्यूज

जनसामान्यांचं प्रेम हिच माझी खरी ताकद, संत मीराबाई संस्थानकडून पंकजाताई मुंडे यांचा ‘कर्मयोगिनी’ पुरस्काराने झाला गौरव, राष्ट्रसंत भगवान बाबांनी त्याकाळी महिलांना खऱ्या अर्थाने आरक्षण दिलं – पंकजाताई

पाटोदा ।दिनांक ०३।
राष्ट्रसंत भगवान बाबांनी त्याकाळी महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून खऱ्या अर्थाने आरक्षण दिलं
संत मीराबाई यांचे आशीर्वाद व महंत राधाताई महाराज यांची गेल्या पंचवीस वर्षापासून ची कठोर साधना याचा परिपाक म्हणून हे संस्थान महिलांची पंढरी झाली आहे. मंत्रीपदाच्या कार्यकाळात मला अनेक चांगली कामं करता आली, ते माझं कर्तव्यच होतं तथापि जनसामान्याचं मिळत असलेलं प्रेम हिच माझी खरी ताकद आहे असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले.

महासांगवी येथे सिद्धसंत मीराबाई आईसाहेब यांच्या २५ व्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्या निमित्त आयोजित स्त्री शक्तीचा जागर महिला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर आ. सुरेश धस , आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. भीमराव धोंडे , माजी जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार , डॉ.सारिका क्षीरसागर , हभप रामकृष्ण रंधवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, महंत राधाताई महाराज यांनी अत्यंत कमी  वयात या गादीचा वारसा सक्षमपणे पुढे नेला आहे कोणत्याही गादीचा वारसा चालवणे हे सोपे नाही. आज महिला आरक्षणाचा लढा आपण लढतोय पण त्याकाळात संत भगवान बाबांनी खऱ्या अर्थाने महिलांना आरक्षण दिले. कारण ते एक  वैभवशाली परंपरेचे संत होते. राजकारणाबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या, राजकारणाची  वाट ही तशी काटेरी आहे. ज्यावेळी मी राजकारणात नवीन होते त्यावेळी मुंडे साहेब माउलीच्या मायेने माझी विचारपूस करून काळजी घेत असत असे सांगताना त्या भावूक झाल्या होत्या. आपल्या कार्यकाळात मला अनेक चांगली कामे करता आली, ते माझं कर्तव्यच होतं. मुंडे साहेबांइतकच लोकांचं प्रेम मला मिळत गेलं या प्रेमापेक्षा मोठी संपत्ती नाही. आपल्याशी नातं जपणं हे  मला मंत्रीपदापेक्षा अधिक महत्वाचं वाटतं असं सांगून त्या म्हणाल्या, हे संस्थान म्हणजे निश्चितच महिलांची पंढरीच असून या संस्थानशी व महंत राधाताई महाराज यांच्याशी असलेले ऋणानुबंध हे चिरकाल कायम राहतील.

*कर्मयोगिनी पुरस्कारानं गौरव*
———
यावर्षी संस्थानकडून प्रथमच  पंकजाताई मुंडे यांचा संत मीराबाई कर्मयोगिनी पुरस्काराने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गर्जे  यांनी केले तर या प्रसंगी भाजपा नेते मधुकर गर्जे  सरपंच चैत्राली सानप,  यांच्यासह मान्यवरांची व हजारो भाविक महिला व नागरिकांची उपस्थिती होती.

Exit mobile version