Site icon लोकाशा-बंब न्यूज

गेवराईतील विवाहित तरूणाने विषारी द्रव प्राशन करून केली आत्महत्या, गेवराई पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरूणाने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप, वारंटचे कारण पुढे करून पोलिस करत होते पैशाची मागणी


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : गेवराईतील एका 26 वर्षीय तरूणाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली आहे. गेवराई पोलिसांच्या त्रासाला कंटाळून सदर तरूणाने आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. वारंटचे कारण पुढे करत गेवराई पोलिस मयताकडे पैशाची मागणी करत असल्याचेही नातेवाईकांनी म्हटले आहे.
आनंद शेरू भोसले (वय 26 वर्षे रा. संजय नगर बीड) असे मयताचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आनंद भोसले यांना एका प्रकरणात कोर्टाचे वारंट होते. वारंट बजावण्याच्या उद्देशाने गेवराई ठाण्याचे पोलिस कर्मचारी त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होते. यातूनच त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जात होता. याच नैराश्यातून मागच्या चार दिवसांपुर्वी भोसले यांनी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते, त्यानंतर त्यांना बीड शहरातील लोट्स रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी रात्री आकराच्या सुमारास मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडला. याठिकाणी त्यांची डीवायएसपींनी समजूत काढून त्यांना बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पाठविले. गेवराई ठाण्याचे सुरेश पारधी, पेरगुलवार, दराडे आणि सोनवणे यांच्या त्रासाला कंटाळूनच भोसलेंनी आत्महत्येचे पाऊल उचलले त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मयताची पत्नी लता आनंद भोसले, बहिण कावेरी काळे, वैशाली काळे यांच्यासह अन्य नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान आता या प्रकरणात पोलिस अधिक्षक काय आणि कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोसलेंच्या कुटूंबावर कोसळला
दुखाचा डोंगर
आनंद भोसले हे विवाहित असून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे, या घटनेमुळे भोसलेंच्या कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version