Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे पाटोदा तालुक्यात मंजूर झाले सतरा किमीचे रस्ते, ग्रामीण रस्त्यांसाठी सोळा कोटी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल खा.प्रितमताई मुंडे यांचे आभार : ऍड.सुधीर घुमरे

पाटोदा । दि.१४ ।
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पाटोदा तालुक्यात सतरा किलोमीटरच्या रस्त्यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, याकरिता सोळा कोटी पन्नास लक्ष रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर घुमरे यांनी दिली आहे. तसेच पाटोदा तालुक्यातील रस्त्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सुधीर घुमरे यांनी खा.प्रितमताई मुंडे यांचे आभारही मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळावी याकरिता खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची भेट घेऊन त्यांना लेखी स्वरूपात मागण्या सादर केल्या होत्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाटोदा तालुक्यातील प्रस्तावित रस्त्यांना निधी वर्ग करण्याची मागणी यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी केल्यामुळे रस्ते कामांसाठी हा निधी मंजूर झाला असल्याचे ऍड. सुधीर घुमरे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये जवळा फाटा ते पाटोदा हा चार कि.मी दोनशे मीटर लांबीचा रस्ता मंजूर झाला असून याकरिता सहा कोटी एकसष्ठ लक्ष रुपये, अमळनेर ते निवडुंगा, चिंचोली हा पाच किमी तीनशे मीटर लांबीचा आणि सहा कोटी वीस लक्ष रुपयांचा रस्ता व कूसळम ते वानेवाडी हा चार किमी सातशे मीटर लांबीचा आणि तीन कोटी सदुसष्ट लक्ष रुपयांच्या रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती ऍड. सुधीर घुमरे यांनी दिली. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पाटोदा तालुक्याच्या वतीने खा.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले.

••••

Exit mobile version