Site icon लोकाशा-बंब न्यूज

१३ महिने २६ दिवसांनी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, राष्ट्रवादीचे पाच बडे नेते स्वागताला; तुफान गर्दी!

मुंबई-१०० कोटी वसुली प्रकरणात कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज कारागृहाबाहेर आले आहेत. देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती आणखी वाढविण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली होती. त्यानंतर आज देशमुखांचा जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर दुपारी पाच वाजता अनिल देशमुख कारागृहा बाहेर आले.
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर आज राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील कारागृहाबाहेर उपस्थित होते. अनिल देशमुख यांचं हार घालून स्वागत करण्यात आलं. तर कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा केला. कारागृहाबाहेर यावेळी प्रचंड गर्दी झाली असून ढोल-ताशांच्या गजरात देशमुख यांचं स्वागत करण्यात आलं आहे.  १२ डिसेंबरला न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने देशमुख यांना जामीन मंजूर केला. नंतर सीबीआयने सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी जामिनावर १० दिवसांची स्थगिती देण्याची विनंती केली होती. ती मान्य झाली. मात्र, सुप्रीम कोर्टाचे सुटीकालीन कोर्ट नसल्याने सीबीआयने पुन्हा हायकोर्टात जामिनावरील स्थगिती ३ जानेवारीपर्यंत वाढविण्याची विनंती केली. मात्र, कोर्टाने ती अमान्य केली होती.

Exit mobile version