बीड । दि. ०५ ।
गायरान जमीन नावावर होत नसल्यामुळे व शबरी घरकुल योजनेतील लाभाचा दुसरा हप्ता मिळत नसल्यामुळे उपोषणास बसलेले मयत आप्पाराव पवार यांच्या कुटुंबियांची खा.प्रितमताई मुंडे यांनी भेट घेतली. कुटुंबप्रमुख आप्पाराव पवार यांच्या निधनानंतर ही उपोषणाचा लढा सुरू ठेवणाऱ्या कुटुंबाचे त्यांनी उपोषण सोडवले व त्यांना धीर दिला, आप्पाराव पवार यांच्या लढ्याला आम्ही न्याय मिळवून देणार आहोत असा विश्वास खा. प्रितमताई मुंडे यांनी पवार यांच्या कुटुंबाला दिला असल्याची माहिती भाजप भटके विमुक्त आघाडीचे डॉ.लक्ष्मण जाधव यांनी दिली.
बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारातील गायरान जमीन आणि शबरी घरकुल योजनेतील लाभासाठी आमरण उपोषणास बसलेले आप्पाराव पवार यांचा उपोषण सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. उपोषणकर्त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच खा.प्रितमताई मुंडे यांनी तात्काळ उपोषणस्थळी धाव घेऊन मयत पवार यांच्या कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर ही उपोषण सुरू ठेवणाऱ्या पवार कुटुंबियांना खा.प्रितमताई मुंडे यांनी न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला. खा.प्रितमताई यांच्यावर विश्वास दाखवत पवार कुटुंबाने ही त्यांचे उपोषण मागे घेतले. मयत आप्पाराव यांचा लढा व्यर्थ जाणार नाही, खा.प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून आम्ही पवार कुटुंबाला न्याय मिळवून देणार आहोत असे डॉ.लक्ष्मण जाधव यांनी सांगितले.
तात्काळ बैठक घ्या, पर्यायी व्यवस्था करा ; खा.प्रितमताईंच्या प्रशासनाला सूचना
मयत पवार यांच्या कुटुंबाची उपोषणस्थळी भेट घेतल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांनी पवार कुटुंबासमक्ष प्रशासनाला संपर्क साधला व सूचना दिल्या.मयत आप्पाराव पवार यांच्या कुटुंबाच्या मागण्यांसाठी प्रशासनाने तात्काळ बैठक घ्यावी, सदर जमीन देण्यास शासकीय अडचण असेल तर पर्यायी जागा उपलब्ध करून दया, अशाप्रकारे कोणत्याही कुटुंबाला बेदखल करता येणार नाही याची गांभीर्याने दखल घेऊन यापुढे अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत याची काळजी करण्याच्या सक्त सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
••••