बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : येत्या 14 डिसेंबरपासून सुरू होणार्या वैद्यकीय व दंत वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीपुर्व वार्षिक परिक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी खा. प्रीतमताई मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.
राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत होणार्या वैद्यकीय परीक्षा डिसेंबर महिन्यात होत आहेत. यात प्रामुख्याने दंत, बि.डी.एस,बीएएमएस यासह इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत, असे असताना विद्यार्थ्यांची क्लिनिकल पोस्टिंग 1 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारी रजा देखील रद्द करण्यात आल्या असल्याचे समजले, परीक्षांचा कालावधी आणि तत्पूर्वीच्या काही दिवसांपर्यंत क्लिनिकल पोस्टिंग राहणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे आणि शैक्षणिक नुकसान करणारे आहे. यासंदर्भात अनेक विद्यार्थी व पालकांनी मला फोन मेसेजद्वारे वैद्यकीय व दंतवैद्यकशास्त्र अभ्यासक्रमाच्या 14 डिसेंबर पासून सुरू होणार्या पदवीपुर्व वार्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात ही मागणी केली आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आपण विद्यार्थी व पालकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे खा. प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.