Site icon लोकाशा-बंब न्यूज

पाकिस्तानवर भारताचा विराट विजय,
रोमांचक सामन्यात भारताचा विजयोत्सव,
कोहली-हार्दिक विजयाचे ठरले शिल्पकार


दिल्ली, दि. 23 (लोकाशा न्यूज) : टी-20 विश्वचषक 2022 मधील सर्वात मोठा सामना भारताने जिंकला. पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. हिरो होता विराट कोहली, ज्याने 82 धावांची नाबाद खेळी केली. भारताने 31 धावांत 4 विकेट गमावल्या. हार्दिकसोबत 113 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना कोहलीनेच सहा धावा असलेल्या संघाला नो बॉलवर विजयाकडे वळवले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

टी 20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने 53 चेंडूत 82 धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी 4 धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली. रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले. भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुर्‍या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो केवळ 2 धावा करून बाद झाला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याने या धावा करताना 4 षटकार आणि 6 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या यानेही 40 धावांचे योगदान दिले. यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला 2 आकडी धावसंख्या पार करता आली नाही. तत्पूर्वी, भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसर्‍या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले. त्याला हार्दिक पांड्याची देखील साथ मिळाली. अष्टपैलू पांड्याने तीन गडी बाद करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले. शान मसूद आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

Exit mobile version