बीड । दि.२३ ।
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले खरीप पीक उध्वस्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी नैराश्याच्या गर्तेत जीवनयात्रा संपवली तर अनेक ठिकाणी वीज पडून जीवितहानी झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेल्या संकटात जीव गमावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबाचे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी चिखल तुडवत वाड्यावस्त्यांवर पोहोचून सांत्वन केले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना खा.प्रितमताई मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील दादासाहेब वांढरे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच सर्पदंशाने मृत्यू झालेल्या कांताबाई झगडे यांच्या कुटुंबाला देखील त्यांनी धीर दिला. पाटोदा तालुक्यातील डोंमरी, डोंगरकिन्ही येथे ही खा.प्रितमताई मुंडे यांनी सांत्वन भेट दिल्या.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून त्यांना उभारी देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून खा.प्रितमताई मुंडे यांनी अपघाती निधन झालेल्या शेतकरी कुटुंबाना धीर दिला. माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव , शिरूर तालुक्यातील दगडवादी येथे वीज पडून निधन झालेल्या शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
नदी ओलांडून पालकमंत्री सावेंसोबत खा.प्रितमताई भानकवाडीत
शिरूर तालुक्यातील भानकवाडी येथील कुंडलिक सोनसळे यांच्या दोन मुली आणि एका नातेवाईकाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. मुलींच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळेलेल्या सोनसळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे पालकमंत्री अतुल सावे यांनी दुर्गम भागातील भानकवाडी गावाला भेट दिली. नदी आणि ओढे ओलांडून, चिखल तुडवत भानकवाडी गावात दाखल होऊन त्यांनी शोकसंतप्त परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश ही सुपूर्द केला. बीड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानीने आपण व्यथित झालो आहोत अशी भावना खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.
••••