Site icon लोकाशा-बंब न्यूज

शेतकर्‍यांनो, धीर सोडू नका, सरकार तुमच्यासोबत ! शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देणार – पालकमंत्री अतूल सावे, खा. प्रीतमताईंनी दिला विश्‍वास, रायमोह मंडळातील ‘त्या’ दोन्ही कुटुंबियांचे केले सांत्वन, बारा लाखाची मदत सुपूर्द


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी शनिवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. शेतकर्‍यांनो, धीर सोडू नका..सरकार तुमच्यासोबतच आहे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देणार असा विश्‍वास यावेळी सावे आणि खा. मुंडे यांनी दिला आहे.
पालकमंत्री अतुल सावे आणि खा. प्रीतमताई यांनी शिरूर का. तालुक्यातील रायमोहा मंडळात ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेतील पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. भानकवाडी येथील कुंडलिक सोनसळे यांच्या दोन मुली व एक 30 वर्षीय सिरसमार्ग येथील पाहुणा साईनाथ भोसले वाहुन गेला होता. तसेच दगडवाडी येथील रावसाहेब जायभाये शेतामध्ये असताना अंगावर विज कोसळल्याने ते जागीच ठार झाले होते. त्यांनी या दुर्दैवी जायभाय व सोनसळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. शासनाच्या वतीने जायभाय कुटुंबाला चार लक्ष रुपये व सोनसळे कुटुंबाला आठ लक्ष रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पालकमंत्री श्री. सावे आणि खा. मुंडे यांनी दगडवाडी व भानकवाडी शिवारात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली व शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी जि.प. सदस्य वैजिनाथ मिसाळ, उपविभागीय अधिकारी नामदेव टीळेकर, तहसीलदार ( शिरूर ) श्रीराम बेंडे , तसेच राजेंद्र मस्के, नवनाथ शिराळे, रामदास बडे, जालिंदर सानप, संभाजी जाधव, वसंतराव सानप, सुभाष क्षीरसागर, यांच्यासह संबंधित अधिकारी, भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सावे यांच्या उपस्थितीत काल जिल्ह्यातील माजलगाव येथील मेळाव्यानंतर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकार्‍यांची भेट घेवून चर्चा केली. जिल्ह्यातील दौर्‍यानंतर त्यांचे औरंगाबादकडे प्रयाण झाले.

Exit mobile version