बीड/प्रतिनिधी
आज बीडमध्ये प्रत्यक्ष येऊन उद्घाटन करण्याची इच्छा होती मात्र कामाचा व्याप लक्षात घेता हे काम थांबवू नये म्हणून ऑनलाईन भूमिपूजन करत आहे,चांगले काम करा जो निधी दिला आहे काम दर्जेदार करून घ्या,जयदत्त आण्णा चांगले काम करा आम्ही पाठीशी आहोत असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले तर आज सुरू होत असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करून घ्या आम्ही दोघेही लोकार्पण सोहळ्यासाठी बीडला येऊ आमचं सरकार बीडच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडकरांना दिला आहे
बीड नगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा क्रमांक दोन मधील बारा रस्त्यांच्या 70 कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ थेट मंत्रालयातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,आ सुरेश धस,युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर, राज्याचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन शुभारंभ सोहळ्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा,प्रशासक नामदेव टिळेकर,मुख्याधिकारी उमेश ढाकणे तसेच माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर नगरपालिकेचे सर्व माजी सभापती सर्व नगरसेवक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रास्ताविक करून बीड शहरातील विविध विकास कामांची माहिती दिली तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड शहरासाठी आणि मतदार संघातील विविध विकास कामांच्या प्रास्तावित कामांची माहिती देऊन यासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी केली यावेळी त्यांनी मराठवाड्यातील प्रमुख प्रश्नांवर प्रकाश टाकला ते म्हणाले पश्चिम वाहिन्या नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला मिळाले तर मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल या सरकारने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहेच परंतु यासाठी आणखी भरून निधीची तरतूद आवश्यक आहे प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज या योजनेअंतर्गत बीड शहरातही मेडिकल कॉलेज मंजूर करावे, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी करून प्रस्तावित करण्यात आलेल्या अमृतअटलच्या कामासाठी 40 कोटी आणि रस्त्यांच्या कामाचे 20 कोटी मंजूर करावेत जेणेकरून शहराचा मुख्य प्रश्न मिटणार आहे,अशी मागणी माजीमंत्री क्षीरसागर यांनी केली
यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे बीड शहरासाठी आवश्यक असणाऱ्या रस्ते विकासाचा शुभारंभ होतो आहे, 2018 ला जयदत्तअण्णा माझ्याकडे आले होते, त्यांचे बंधू डॉ भारतभूषण क्षीरसागर हे देखील त्यांच्या सोबतच होते शहरासाठी लागणाऱ्या निधीची मागणी त्यांनी सातत्याने केली होती त्याचवेळी मी स्वतः 88 कोटी रुपये मंजूर केले होते त्या निधीतून बीड शहरातील 16 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत रस्ते तयार होताना जनतेला त्रास झाला आणि त्याचा त्रास जयदत्त अण्णांनाही झाला , त्यांचे काम खूप चांगले आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय केशर काकूंचा हा बीड जिल्हा आहे या जिल्ह्यात जे जे प्रश्न सोडवता येतील त्यासाठी आमचं सरकार निश्चितच पुढाकार घेऊन प्रयत्न करेल आगामी काळात संपूर्ण राज्यातील प्रत्येक शहरात पिण्याचे पाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घेऊन ही कामे पूर्ण करणार आहोत जयदत्त अण्णांनी निमंत्रण दिले आहे आता रस्ते पूर्ण झाल्यावरच मी आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे दोघेही बीडला येऊन झालेल्या रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा पूर्ण करू आमच्या सरकार बीडच्या पाठीशी आहे आजच राज्यातील सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करत आहोत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे ते म्हणाले
यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जयदत्त अण्णांचा सातत्याने पाठपुरावा असतो त्यांचा वैयक्तिक प्रश्न त्यांनी कधीच मांडला नाही परंतु त्यांचे सगळेच प्रश्न हे जनहिताचे आहेत म्हणूनच आम्ही भविष्यातही विकासासाठी निधी देण्यासाठी प्राधान्य देणार आहोत, मराठवाड्यातील प्रमुख प्रश्न उपस्थित करून जयदत्त अण्णांनी ते सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे मी नगर विकास मंत्री होतो त्याचवेळी जयदत्त अण्णांनी रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी केली होती खरंतर रस्त्याची कामे होणे महत्त्वाचीच आहेत म्हणून यासाठी प्राधान्याने 69 कोटी रुपये तात्काळ मंजूर केले आज या कामाचा भूमिपूजन सोहळा ऑनलाईन पद्धतीने मी करत आहे प्रत्यक्ष येण्याची इच्छाच होती मात्र कामाचा व्याप वाढलेला आहे हे काम थांबू नये यासाठी ऑनलाईन द्वारे हा शुभारंभ करत आहे हे सरकार जनतेचे आहे जनतेची कामे करून राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे चांगले काम करा जो निधी दिला आहे त्यातून दर्जेदार कामे होणे अपेक्षित आहे निधी कमी पडणार नाही अधिकाऱ्यांनीही याबाबत सातत्याने लक्ष ठेवून कामे दर्जेदार करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत जयदत्त अण्णांचे काम चांगले आहे त्यामुळेच आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगून त्यांनी बीड शहरातील बारा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्याची घोषणा केली,जवळपास दोन तास सुरू असलेल्या या कार्यक्रमास नाट्यगृहात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी डॉ सारिका क्षीरसागर,अरुण डाके,अमर नाईकवाडे,फारूक पटेल,भीमराव वाघचौरे,विनोद मुळूक,अमृत सारडा,यांनीही मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्रीराम जाधव यांनी केले तर आभार गिरीश देशपांडे यांनी मानले,यावेळी डॉ दिपाताई क्षीरसागर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
चौकट
डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे शुभारंभ करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा कामाची सुरुवात माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली यावेळी डॉ सारिका क्षीरसागर, डॉ दिपाताई क्षीरसागर सर्व सभापती नगरसेवक नागरिक उपस्थित होते