बीड दि.१९ (प्रतिनिधी)-शहरातील विविध रस्त्यांची कामासाठी निधी मंजूर झाला असून या कामांना मंजुरी देखील मिळाली होती.मात्र आता नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी १२ कामे सुरु करता येणार नसल्याचे पत्र आ.संदीप क्षीरसागरांना दिले आहे.या रस्त्यांचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याने रस्त्याचे कामांचे उदघाटनाला मिळालेल्या परवानगीला पुन्हा स्थगिती देण्यात आल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नगरपालिकेने मंगळवारी (दि.१८) बीड शहरातील १२ विकास कामे सुरु करण्यास मनाई केली आहे.या रस्त्यांसाठी नगरोत्थान (राज्यस्तर) अंतर्गत सिमेंट काँक्रीट व नाल्याचे काम होणार होते.यामध्ये अंबिका चौक ते अर्जुन नगर रस्ता,राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल रस्ता,राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम,बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल सिमेंट रस्ता व नाली,कासट ते शहर पोलीस स्टेशन रस्ता,मसरत नगर ते नेत्रधाम-सावरकर चौक रस्ता,शीतल वस्त्र भंडार दोन्ही बाजूचे रस्ते,पेठबीड पोलीस स्टेशन-ईदगाह-नाळवंडी नाका रस्ता,नाळवंडी नाका-पाण्याची टाकी रस्ता,बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा रस्ता,बार्शी रोड मुक्ता लॉन्स-तक्कीया मज्जित आदी विकास कामांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झाल्याशिवाय परवानगी मिळणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यानी म्हटल्याने आता आ.संदीप क्षीरसागर यांनी या प्रश्नांवर आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.विकास कामांना निधी मिळाला असतानाही कामे सुरु होणार नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असून आता आ.क्षीरसागरांनीच थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.