Site icon लोकाशा-बंब न्यूज

भगीरथ बियाणी यांच्या दुःखद निधनाची बातमी अस्वस्थ अन् सुन्न करणारी, पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकाकुल भावना

बीड । दिनांक ११।
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या दुःखद निधनाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. बियाणी हे धडाडीचे कार्यकर्ते होते, त्यांचं असं अचानक जाणं मनाला अस्वस्थ आणि सुन्न करणारं आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

पंकजाताई मुंडे आज मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी त्या सकाळी उज्जैनला रवाना झाल्या. इंदौर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना बियाणी यांच्या निधनाची बातमी समजली आणि धक्काच बसला. आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करतांना त्या म्हणाल्या, भगीरथ हा माझा जवळचा आणि लाडका कार्यकर्ता होता. माझ्या जीवाच्या कार्यकर्त्यांनं असं कसं केलं. त्यांचं जाणं धक्कादायक आहे, प्रचंड दुःख होतयं, ते शब्दात व्यक्त करता येत नाही. ही घटना मनाला खूप अस्वस्थ आणि सुन्न करणारी आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करते की, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
••••

Exit mobile version