परळी वैजनाथ ।दिनांक २९।
संपूर्ण देशात एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केलं.
महाराष्ट्र शासनाच्या परळी व अंबाजोगाई येथील बाल विकास प्रकल्पाच्या वतीने पोषण माह महोत्सवातंर्गत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मागील सत्तेच्या काळात बालविकास खात्याची मंत्री म्हणून मला चांगले काम करता आले. कुपोषणमुक्तीसाठी आपण पुढाकार घेतला होता.आपला देश कुपोषण मुक्त व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काम करत आहेत .एकही बालक कुपोषित राहू नये हा यामागे उद्देश आहे. कुपोषण मुक्तीच्या या लढयात अंगणवाडी मदतनीस, सेविकांसह सर्वांनी योगदान देऊन काम करावं असं आवाहन यावेळी पंकजाताईंनी केलं.
प्रारंभी बाल विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पंकजाताई यांचं स्वागत केलं. कार्यक्रमास भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, बाल हक्क आयोगाच्या माजी सदस्य डाॅ. शालिनी कराड, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुचिता पोखरकर आदींसह अंगणवाडी मदतनीस, सेविका यावेळी उपस्थित होत्या.
••••