Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील आणखी 31 मंडळांना अग्रीम मंजूर, विमा कंपनीने धारूर तालुका पुन्हा 25 टक्के अग्रीमसाठी ठेवला वंचित


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात मोठे नुकसान होवूनही शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव विमा कंपनीने मांडला आहे, सोयाबीनचे रॅण्डम सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील 16 मंडळासाठी 25 टक्के अग्रीम मंजूर करण्यात आले होते, त्यानंतर याच विषयावर पुन्हा एखदा मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, या बैठकीत जिल्ह्यातील आणखी 31 मंडळांतील सोयाबीनसाठी 25 टक्के अग्रीम मंजूर करण्यात आले आहे, यामध्ये बीड, राजूरी, पेंडगाव, पाचेगाव, तलवाडा, दिंद्रुड, नाळवंडी, दौलावडगाव, अंमळनेर, धोंडराई, रेवकी, होळ, तिंतरवणी, शिरूर, कवडगाव, येळंबघाट, घाटसावळी, चर्‍हाटा, दादेगाव, काळेगाव, मंजरथ, उजणी,चिंचोली माळी, मस्साजोग, मोहा, कुसळंब, ब्रम्हनाद येळंब, गोमळवाडा, पारगाव सि., कुर्ला, पाडळसिंगी मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 63 मंडळ असून आतापर्यंत 47 मंडळांना अग्रीम मंजूर झाले असून उर्वरित 16 मंडळांना अग्रीम का मंजूर करण्यात आले नाही, असा प्रश्‍न आता उद्भवत आहे. वंचित राहिलेल्या 16 मंडळांनाही 25 टक्के अग्रीम मंजूर करावे, अशी बाजू जिल्ह्याचे कृषी अधिक्षक बाबासाहेब जेजूरकर यांनी लावून धरली होती, मात्र त्यांच्या या बाजूला विमा कंपनीने अडकाठी घातली असल्याचे समोर येत आहे.

अग्रीमपासून धारूर तालुका वगळला
धारूर तालुक्यातही सोयाबीनचे खूप मोठे नुकसान झालेले आहे, मात्र 25 टक्के अग्रीमपासून हा तालुका वगळण्यात आला आहे. या तालुक्याला कुणी वालीच नसल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

नुकसानग्रस्त एकाही शेतकर्‍याला मदतीपासून
वंचित ठेवू नका – खा. प्रीतमताई मुंडे
पावसाने मारलेली दडी आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळणे आवश्यक आहे. या नुकसान भरपाई संदर्भात विशेष बाब म्हणून सरकारच्या विचाराधीन आहे, त्यामुळे अनुदान असेल की अग्रीममधून मिळणारी मदत, अशा नुकसानग्रस्त एकाही शेतकर्‍याला मदतीपासून वंचित ठेवू नये, मदतीसंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जो संभ्रम होत आहे तोही प्रशासनाने तात्काळ दुर करावा, असे खा. प्रीतमताई मुंडे यांनी म्हटले आहे.

सर्व पीकांना 25 टक्के अग्रीम द्या – धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यातील सोयाबीनसह विमा लागू असलेल्या विविध पिकांचे रँडम सर्वेक्षण करून जिल्ह्यातील 62 पैकी 16 महसुली मंडळांमधील सोयाबीन पिकविमा धारक शेतकर्‍यांना 25% अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला असून, सोयाबीनसह मागील तीन महिन्यात कमी अधिक पावसाने व किडींच्या विविध प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या व पीकविमा लागू असलेल्या कापूस, तूर, मूग, उडीद आदी सर्वच पिकांना सर्वच महसुली मंडळांमध्ये 25% अग्रीम विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मदतीपासून वंचित ठेवणे हा शेतकर्‍यांवर
मोठा अन्याय – आ. प्रकाश सोळंके
अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत राज्य सरकारने बीड जिल्हा वगळून मराठवाड्यातील इतर सर्व जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना मदत जाहीर केली आहे. तसेच महसूल व कृषी विभागाने संपूर्ण बीड जिल्ह्याचे सर्वेक्षण केले असता त्या सर्वेक्षनाच्या माध्यमातून 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. बीड जिल्ह्यातील 65 महसूल मंडळा पैकी 16 महसूल मंडळांनाच 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला दिले. त्यामुळे 70 टक्के शेतकरी अग्रीम पासून वंचित राहिला आहे. हा शेतकर्‍यांवर मोठा अन्याय आहे आणि तो आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असा ईशारा आ. सोळंके यांनी दिला आहे.

गेवराईतील सर्वच मंडळाला 25 टक्के अग्रीम
लागू झाला पाहिजे – आ.लक्ष्मण पवार
गेवराई तालुक्यातील सर्वच मंडळात नुकसान झालेले असताना जिल्हा प्रशासनाकडून फक्त तीनच मंडळात 25 टक्के अग्रीम मंजूर केल्याने इतर मंडळावर अन्याय झालेला आहे. याबाबत स्पॉट पंचनाम्यासह सर्व पुरावे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले असून गेवराई तालुक्यातील सर्वच मंडळाला 25 टक्के अग्रीम लागू झाला पाहिजे, असा पाठपुरावा आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केला आहे.

सर्व मंडळांना समान नुकसान
भरपाई द्या-आ.संदीप क्षीरसागर
बीड विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरात पावसाची सरासरी कमी झाल्यामुळे पीकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे महसुल व कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. परंतू शासन परिपत्रकाप्रमाणे 25 टक्के नुकसान भरपाई देत असतांना सर्व मंडळांचा विचार झालेला नसून बीड मतदार संघासह जिल्हाभरातील सर्व मंडळांना समान नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे केली आहे.

आज आ. सोळंके बीडमध्ये
घेणार बैठक
शेतकर्‍यांना अनुदान आणि अग्रीमपासून वंचित ठेवून जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. याच अन्यायावर वाचा फोडण्यासाठी
आज सकाळी आकरा वाजता बीड येथील शासकिय विश्रामगृहावर सर्व राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी संघटना, सामाजिक संस्थांची आ. प्रकाश सोळंके बैठक घेणार आहेत. या बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी आ. सोळंके यांनी केले आहे.

पीकांचे मोठे नुकसान, सर्वच शेतकर्‍यांना
अग्रीम मंजूर करावा – नंदकिशोर मुंदडा
पावसाने मारलेली दडी आणि सोयाबीनसह इतर पीकांवर वेगवेगळ्या कारणांनी झालेल्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सर्वच शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम मंजूर करून त्यांना आधार द्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून केली आहे.

Exit mobile version