Site icon लोकाशा-बंब न्यूज

पालिका, झेडपी, पंचायत समितींच्या प्रशासकांना मुदतवाढ; निवडणुका पुन्हा लांबणीवर


मुंबई, दि. 12 (लोकाशा न्यूज) : राज्यातील 18 महापालिका, 164 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्यांची मुदत यापूर्वीच संपली आहे. येथील प्रशासकाला ता. 15 सप्टेंबरनंतर सहा महिने पूर्ण होत आहेत. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी होणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय आज (ता. 12 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता निवडणुकीचा पहिला टप्पा दिवाळीत सुरू होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याशिवाय, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा वाद अजूनही मिटलेला नाही. या प्रशासकाच्या मुदतवाढीच्या कालावधीत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुदतवाढ संपल्यानंतर दिवाळीत
या निवडणुका होतील

स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकाला दिलेली मुदतवाढ संपल्यानंतर सोलापूर, नाशिक, मुंबई, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या 18 महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. तसेच, 164 नगरपालिकांची निवडणूक ओबीसी आरक्षणासह होईल. दुसर्‍या टप्प्यात 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक हेातील, असे निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
Exit mobile version