Site icon लोकाशा-बंब न्यूज

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा जाणण्यासाठी खा. प्रीतमताई पोहचल्या बांधावर!, महसूल, कृषी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सोबत घेवून केली नुकसान झालेल्या पिकांची पाहणी


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : नेहमीप्रमाणे याही वर्षी निसर्ग बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर कोपला आणि जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी संकटात अडकला, वास्तविक पाहता निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी खा. प्रीतमताई मंगळवारी शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचल्या. यावेळी त्यांनी महसूल, कृषी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आपल्या सोबत घेवून नुकसान झालेल्या पीकांची पाहणी केली आहे. शेतकरी हाच आपला केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत, असा विश्‍वास यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिला आहे. याअनुषंगानेच त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.

निसर्गाच्या अवकृपेमुळे या वर्षी बीड जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यांची हीच अडचण लक्षात घेवून मंगळवारी अंबाजोगाई तालुक्यातील भारज, लिंबगाव, खजेवाडी शिवारातील नुकसानग्रस्त शेतीची खा. प्रीतमताई मुंडे यांनी महसूल,कृषी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सोबत घेवून पाहणी केली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्या बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानी संदर्भात बैठकही घेणार आहेत. या बैठकीत शेतकर्‍यांनी मांडलेल्या व्यथा आणि अडचणींवर गांभीर्याने चर्चा करण्यात येणार आहे. अवर्षण,गोगलगाय याविषयी शासन दरबारी पाठपुरावा करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. शेतकरी हाच आपला केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकर्‍यांना निश्चित शासकीय मदत मिळेल, असा विश्‍वास यावेळी खा. मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिला आहे.
Exit mobile version