Site icon लोकाशा-बंब न्यूज

हस्तांतरित होण्यापूर्वीच क्रीडा संकुलाची दुरावस्था; आ. नमिता मुंदडांकडून अधिकारी, कंत्राटदाराची झाडाझडती, नवीकोरी इमारत गळू लागली; एक महिन्यात स्वखर्चातून दुरुस्तीचे कंत्राटदाराचे लेखी आश्वासन

अंबाजोगाई – केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शुक्रवारी अंबाजोगाई येथील तालुका क्रीडा संकुलाची पाह्मी केली. हस्तांतरित होण्यापूर्वीच गळत असलेली नवीकोरी इमारत, वापरण्यात आलेले सुमार दर्जाचे साहित्य पाहून संतापलेल्या आ. मुंदडांनी शनिवारी अंबाजोगाई तहसील कार्यालयात तडकाफडकी बैठक बोलावत संबंधित गुत्तेदार, वास्तूविशारद सल्लागार, अधिकारी यांना तिसऱ्या पट्टीत खडसावत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. आमदारांच्या इशाऱ्यानंतर कंत्राटदाराने एक महिन्यात सर्व दुरुस्ती करून देण्याचे लिखित आश्वासन दिले.

अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकाजवळ कोट्यावधी रुपये खर्चून तालुका क्रीडा संकुलाची भव्य इमारत उभारण्यात आली. त्यासोबतच जॉगिंग ट्रॅक आणि बॅडमिंटन हॉल देखील अंतर्भूत करण्यात आला. २०१९ साली या इमारतीचे उद्घाटन देखील उरकून घेण्यात आले. तसेच कंत्राटदाराचे पूर्ण देयकही देण्यात आले. मात्र, त्यानंतर राहिलेली दुरुस्तीची कामे आणि कोरोनामुळे या इमारतीचे हस्तांतरण रखडले. दरम्यान, आ. नमिता मुंदडा यांनी क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामात लक्ष घातले. स्वतः आर्किटेक्ट असलेल्या आ. मुंदडा यांनी पाच वेळेस क्रीडा संकुलास भेट देऊन कामातील त्रुटी हेरल्या. ओबडधोबड बांधकाम, वापरलेले तकलादू साहित्य पाहून त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या. त्यानंतर आ. मुंदडा यांनी शुक्रवारी पुन्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली. यावेळी त्यांना नवीकोरी इमारत गळत असलेली आढळून आले. तसेच, बॅडमिंटन हॉल व कार्यालयीन बांधकामात अनेक उणिवा जैसे थे असून संकुलाच्या बाहेरील जॉगिंग ट्रॅकचे तळ्यात झालेले रुपांतर आणि स्वच्छतागृहातील साहित्य देखील सुमार दर्जाचे दिसून आले. बॅडमिंटन हॉलला लावलेले पारदर्शक पत्रे, गलका हॉल पाहून संतापलेल्या आ. मुंदडा यांनी शनिवारी दुपारी तहसील कार्यालयात तडकाफडकी बैठक घेतली. या बैठकीस संबंधित कंत्राटदार, वास्तूविशारद सल्लागार यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत आमदारांनी कामातील त्रुटी दूर न केल्याबद्दल तिसऱ्या पट्टीत खडसावले आणि महिनाभरात दुरुस्ती न केल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यावर कंत्राटदाराने एक महिन्यात स्वखर्चातून संपूर्ण दुरुस्ती करण्याचे लिखित आश्वासन दिले. काम पूर्ण केल्याशिवाय इमारत हस्तांतरित करून घेऊ नये असे आदेश यावेळी आ. मुंदडा यांनी दिले.

या बैठकीस ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, तहसीलदार विपिन पाटील, गटविकास अधिकारी काळे, जिल्हा क्रिडा अधिकारी देशमुख, अरविंद विद्यागर, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत पाटील, केंद्रे, भाजप नेते गणेश कराड, शेख रहीम, भाजप तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, हिंदुलाल काकडे, वैजनाथ देशमुख, ॲड. संतोष लोमटे, गणेश देशमुख, खलील मौलाना, शरद इंगळे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातून खेळाडू घडावेत
बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे या क्रीडापटूने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य सुविधा आणि प्रशिक्षण मिळाल्यास अनेक जागतिक दर्जाचे खेळाडून निर्माण होतील. माझ्या मतदार संघातूनही असेच खेळाडू घडावेत. उदयोन्मुख खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही.

Exit mobile version