Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बावीस गावच्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, पैठण उजव्या कालव्याद्वारे लाभ क्षेत्रात सोडण्यात आले पाणी ; माजलगाव तालुक्यातील पिकांना मिळणार नवसंजीवनी

माजलगाव । दि. २५ ।
नाथसागर धरणातून सोडलेले पाणी माजलगाव तालुक्यातील लाभ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शेतीसाठी सोडण्यात यावे या शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी पाटबंधारे विभागाला लाभ क्षेत्रातील शेतीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यांच्या मागणीला पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडले आहे, या निर्णयामुळे तालुक्यातील बावीस गावच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील पंधरा दिवसांपासून पर्जन्यवृष्टीत खंड पडल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, माजलगाव धरणात नाथसागरातून पाणी सोडण्यात आले असल्यामुळे धरणात मुबलक पाणी होते. परंतु लाभ क्षेत्रातील गावांना या पाण्याचा शेतीसाठी लाभ होत नसल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था स्थानिक शेतकऱ्यांची झाली होती. शेतकऱ्यांच्या या व्यथेची जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी तात्काळ दखल घेतली आणि पाटबंधारे विभागाशी बोलून शेतीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या, तदनंतर काही तासांच्या कालावधीत उजव्या कालव्याचे पाणी लाभक्षेत्रात सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. पिकांना नवसंजीवनी देणारा तसेच शेतकऱ्यांची चिंता मिटवणारा निर्णय घेण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्याबद्दल भाजप तालुकाध्यक्ष अरुण आबा राऊत व जिल्हा सचिव बबन बाप्पा सोळंके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने खा.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान पिकांना पाण्याची गरज बघता पैठण उजव्या कालव्याद्वारे लाभ क्षेत्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतीपिकांना वेळेवर पाणी मिळणार आहे. पावसाअभावी सुकू लागलेली पिके पुन्हा जोमाने बहरतील आणि निसर्गाच्या दुष्टचक्रापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हा विश्वास माजलगाव तालुक्याच्या लाभ क्षेत्रातील बावीस गावच्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला असून खा.प्रितमताई मुंडे यांच्या कार्यतत्परतेचे शेतकऱ्यांमधून कौतुक केले जाते आहे.

•••••

Exit mobile version