Site icon लोकाशा-बंब न्यूज

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना दणका, टीईटी घोटाळ्यामुळे दोन्ही मुलींचा पगार बंद

बीड – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षक असणाऱ्या दोन्ही मुलींचा बोगस टीईटी प्रमाणपत्र घोटाळ्यात समावेश असल्याने पगार बंद करण्यात आला आहे. सत्तार यांच्या या दोन्ही मुलींनी टीईटी प्रमाणपत्र बोगस जोडल्याचे उघड झाल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता. आता शासनाच्या आदेशानुसार यांच्यासह दोषी शिक्षकांचे पगार बंद करण्यात आले आहेत.

राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता अर्थात टीईटी घोटाळ्यात तब्बल 7880 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र जोडल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये तत्कालीन राज्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते.

शेख हिना कौसर अब्दुल सत्तार आणि शेख उजमा नाहीद अब्दुल सत्तार या दोघी गेल्या तीन ते चार वर्षांपासून नॅशनल उर्दू प्री स्कुल सिल्लोड येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत होत्या.या काळात त्यांनी 2019 साली टीईटी परीक्षा दिली.मात्र त्यात उत्तीर्ण न होताच बोगस उत्तीर्ण प्रमाणपत्र जोडले.

राज्यभरात टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर या दोघींची नावे त्यात असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान जे 7880 शिक्षक दोषी आहेत त्यांचे शालार्थ आय डी ब्लॉक करून ऑगस्ट पासून त्यांचा पगार बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते.त्यानुसार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींचा पगार बंद करण्यात आला आहे.

मंत्रीपदावर असताना सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे बोगस प्रमाणपत्र लाभार्थ्यांच्या यादीत आल्यानंतर विरोधकांनी एकच गोंधळ केला होता.त्यावेळी माझ्या मुली दोषी असतील तर कारवाई करावी असे सत्तार यांनी म्हटले होते.आता सत्तार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version