Site icon लोकाशा-बंब न्यूज

वरपगांवच्या ‘त्या’ मुस्लिम तरूणाच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान देणार मदतीचा हात, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी शेख कुटुंबियाची भेट घेऊन केले सांत्वन

केज ।दिनांक १६।
वीजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या वरपगाव येथील मुस्लिम समाजातील तरूणाच्या कुटुंबियांची खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी १३ ऑगस्ट रोजी भेट घेऊन सांत्वन केले होते, दरम्यान, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने शेख कुटुंबियांना मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

वरपगाव येथील शेख कुटुंब शेतात एका पत्र्याच्या घरात वास्तव्यास आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त इतरांप्रमाणे त्यांनी तिरंगा ध्वज लावला होता. परंतु तिरंगा लावल्यानंतर काही वेळाने झेंडा कलून घराच्या जवळून जाणाऱ्या विद्युत तारांना झेंड्याच्या पाईपचा स्पर्श झाला त्यात मुख्तार शेख या तरुणाला वीजेचा धक्का बसला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. मुख्तार हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वरपगाव येथे जाऊन शेख कुटुंबाची भेट घेतली व त्यांना धीर देऊन त्यांचे सांत्वन केले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे शेख कुटुंबियांना मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
••••

Exit mobile version