Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांच्या भव्य “तिरंगा रॅली”ने परळीत जागविले देशप्रेमाचे स्फुलिंग, ढोलताशांचा निनाद, फटाक्यांची आतिषबाजी, थरारक कवायती अन् विद्यार्थ्यांची आकर्षक वेषभूषा, रंगीबेरंगी रांगोळी अन् ठिकठिकाणी तिरंगा ध्वजाने चौक सजले ; रॅलीवर पुष्पवृष्टी करत पंकजाताईंना महिलांचे अनोखे रक्षाबंधन, तुमचं अन् माझं नातं विश्वासाचं ; जनतेच्या प्रश्नांसाठी शेवटपर्यंत लढेल – पंकजाताईंनी व्यक्त केला विश्वास

परळी वैजनाथ ।दिनांक १३।
ढोलताशांच्या आकर्षक आणि थरारक कवायती, शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लक्षवेधी वेशभूषा, “भारतमाता की जय” च्या गगनभेदी घोषणा, फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि बघावे तिकडे तिरंगा ध्वज अशा उत्साही व मंगलमय वातावरणात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात काढलेल्या भव्यदिव्य तिरंगा रॅलीने अक्षरशः देशप्रेमाचे स्फुलिंग फुलविले. “तिरंगा रॅली”चे नागरिकांनी ठिक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. तिरंगा ध्वज फडकवत, ढोल वाजवत पंकजाताईंनी लोकांमध्ये चैतन्य जागवले. तिरंगा रॅलीने नागरीकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

“घरोघरी तिरंगा” अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी भाजपच्या वतीने आज शहरात भव्य आणि दिव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन जनतेला केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत रॅलीला सुरवात झाली. पंकजाताई मुंडेंनी श्रीफळ वाढवून ढोलताशांच्या आकर्षक कवायतीचा शुभारंभ करत ढोलही वाजवला. ” भारतमाता की जय, वंदे मातरम, स्वतंत्र भारताचा विजय असो”, वंदेमातरम् अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता. उघड्या जीपमध्ये हातात तिरंगा ध्वज फडकावत पंकजाताई मुंडे रॅलीमध्ये सहभागी झाल्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन सुरू झालेली ही रॅली अण्णाभाऊ साठे चौक – बस स्थानक – रेल्वे स्थानक – एकमिनार चौक – स्टेशन रोड – भवानी नगर – आर्य समाज मंदिर – राणी लक्ष्मीबाई टॉवर आदी मार्गाने जाऊन मोंढा मैदानात रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले.

तुमचं अन् माझं नातं विश्वासाचं

यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आणि देशभर त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या देशाचा, स्वातंत्र्याचा प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे असे सांगून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आपल्याला स्वाभिमानाने जगणे शिकवले आहे. त्यांचाच वसा आणि जनसेवेचा वारसा आपण पुढे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
“तुमचं आणि माझं नातं विश्वासाचं आहे. आज मला अनेक बांधवांनी राख्या बांधल्या हा राखीचा धागा आपल्यामध्ये विश्वासाचं नातं निर्माण करणारा आहे. मी चुकीचे वागत नाही हा जनतेला विश्वास आहे असे सांगून काही शक्ती महिलांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत,ते सहन केले जाणार नाही असा इशारा देऊन त्याविरुद्ध नागरिकांनी पेटुन उठण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.

..म्हणून कुठलीही हरणार नाही

राज्यातील महिला, युवा , शेतकरी बांधव आदींचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी मी आग्रही आहे. ओबीसी व मराठा आरक्षण पुन्हा मिळाले पाहिजे यासाठी आणि समाजाच्या प्रत्येक प्रश्नांकरिता मी सतत संघर्ष करेन. तुमच्यासारखे सच्चे मावळे सोबत आहेत तोपर्यंत मी कुठलीही लढाई हरणार नाही. फक्त तुमची साथ हवी आहे असे म्हणताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाली.

ज्येष्ठांचा गौरव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वयाची पंचाहत्तरी पुर्ण केलेल्या शहरातील ३१ ज्येष्ठ नागरिकांचा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पंकजाताईंनी त्यांना वंदन करून आशीर्वाद घेतले. सत्कारामुळे जेष्ठ नागरिक भावनिक झाले होते.

क्षणचित्रे

Exit mobile version