Site icon लोकाशा-बंब न्यूज

जालन्यात IT Raid कशी पडली, स्टील आणि भंगार व्यावसायिकांची चलाखी, GST खात्याने दिली टीप….

प्राप्तीकर खात्याकडून गेल्या आठ दिवसांपासून जालना जिल्ह्यात सुरु असणाऱ्या छापेमारी मोहिमेची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. या छापेमारी सत्रात जिल्ह्यातील स्टील व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांकडील तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती प्राप्तीकर खात्याकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणावर रोकड आणि सोने असल्याची माहिती आहे. आयकर खात्याकडून गुरुवारी संध्याकाळी याबाबत पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच या सगळ्या प्रकरणातील एक-एक दुवा समोर यायला सुरुवात झाली आहे. जालन्यातील स्टील व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांची कर वाचवण्यासाठीची एक चलाखी जीएसटी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर केंद्र आणि राज्यातील जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी या धाडी टाकल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाने जालना आणि औरंगाबाद परिसरात हे छापे टाकले होते. जीएसटी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आयकर खात्याने १० दिवस प्राथमिक तपासणी केली. यामध्ये जालना परिसरातील काही स्टील आणि भंगार व्यापारी बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट घेत असल्याचे निदर्शनास आले. या इनपूट टॅक्स क्रेडिटचा वापर करून संबंधित व्यापाऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात करबुडवेगिरी सुरु होती. एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर इनपूट टॅक्स क्रेडिट घेतले जाते. तेव्हा व्यापाऱ्यांकडून संबंधित कर भरला जातो. परंतु, या वस्तू विकल्यानंतर इनपूट टॅक्स क्रेडिटमुळे प्राप्तीकराची रक्कम कमी होते. वस्तू विकत घेताना जेवढे इनपूट टॅक्स क्रेडिट असेल तेवढ्या रक्कमेची प्राप्तीकरातून सूट मिळते. जीएसटी करातील हीच पळवाट वापरून जालन्यातील व्यावसायिक मोठ्याप्रमाणावर कर बुडवत होते, हे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले. त्यानंतर आयकर विभागाने मोहीमेची व्यवस्थित आखणी करून हे छापे टाकले. या छापेमारीत आयकर खात्याचे मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील तब्बल २६० कर्मचारी सहभागी झाले होते.
आयकर खात्याने कोणालाही सुगावा लागू न देता गुप्तपणे ही मोहीम राबवली. यामध्ये मुख्यत्वेकरून जालन्यातील स्टील व्यावसायिक, भंगार व्यावसायिक आणि काही बँकांचाही समावेश आहे. जालन्यातील एसआरे स्टील कंपनी, कालिका स्टील कंपनीवर छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. विमलराज सिंघवी आणि प्रदी बोरा हे व्यावसायिक कारवाईच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले जाते. आता यामध्ये आणखी मोठ्या रक्कमेचे व्यवहार आढळून आल्यास या प्रकरणात ईडी देखील सहभागी होऊ शकते. त्यामुळे आता हे सगळे प्रकरण आणखी किती वाढणार, हे पाहावे लागेल.

नोटा मोजायला १२ मशिन्स आणि १४ तासांचा अवधी
आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. त्यामुळे बँकेच्या टेबलांवर ठिकठिकाणी नोटांच्या बंडलांची थप्पी रचलेली दिसत होती. इतके कर्मचारी आणि १२ मशिन्स दिमतीला असूनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. इतक्या मशिन्स वापरुनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तासांचा अवधी लागला. यावरून मराठवाड्यातील ही कारवाई किती मोठी असेल, याचा अंदाज येऊ शकतो.

Exit mobile version