पुणे, दि. 3 (लोकाशा न्यूज) : राज्यात वर्षभरापूर्वी उघडकीस आलेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. पुणे सायबर पोलिसात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला. त्यानंतर राज्य शिक्षण परिषदेने 2019 आणि 2020 मध्ये परीक्षा दिलेल्या आणि नोकरीस लागलेल्या तब्बल 7880 उमेदवारांना अपात्र घोषित केले आहे. यातील जे उमेदवार नोकरीस लागले असतील त्यांची सेवासमाप्ती आणि इतर उमेदवारांना पुन्हा कधीही परीक्षा देता येणार नाही असे परिपत्रक काढले आहे. परीक्षा परिषदेच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.
टीईटी घोटाळ्याबाबत 16 जाने. 2021 ला पुणे सायबर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक 480 पानी पत्रक जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे यात परिषदेने गैरव्यवहार करणार्या 7880 उमेदवारांची यादीच जाहीर केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2019 (19 जाने. 2020) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या जर नियुक्त्या झाल्या असतील तर त्यांची सेवा तात्काळ संपविण्यात यावी. आणि याची नोंद नियुक्त्या झालेल्या विभागांनी घ्यावी असे आदेश या पत्रकात देण्यात आले आहेत. सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता त्यात असं निष्पन्न की 7880 उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल असल्याचं दिसून आले. म्हणजे प्रत्यक्षात ते असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतलेलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतिम निकाल 28 ऑगस्ट 2020 ला परीक्षा परिषदेच्या स्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 16705 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 7880 उमेदवार गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचं निष्पन्न झालंआहे. 293 उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलं आहे. तर उर्वरीत 87 उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात आढळून आलेले आहे. तेव्हा परीक्षा दिलेल्या या उमेदवारांना आता कधीही परीक्षा देता येणार नाही. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येतील.