Site icon लोकाशा-बंब न्यूज

समाजाच्या सेवेचा उपक्रम हाती घेऊन वाढदिवस साजरा करा – पंकजाताई मुंडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन,भेटीसाठी येण्यापेक्षा जिथं आहात तिथूनच शुभेच्छा द्या ; वंचित, पिडितांची सेवा हयाच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा

मुंबई ।दिनांक २४।
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हार, बुके, मोठं सेलिब्रेशन करण्यापेक्षा समाजातील गरजूंना मदत करा, समाजाच्या सेवेचे उपक्रम राबवा, आपल्या हातून झालेली वंचित, पिडित घटकांची सेवा हयाच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा आहेत असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे. वाढदिवसाला भेटीसाठी येऊ नका, जिथं आहात तिथूनच शुभेच्छा द्या अशी विनंतीही त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस येत्या २६ जूलै रोजी आहे, त्या अनुषंगाने त्यांनी राज्यभरातील तमाम कार्यकर्त्यांना यासंदर्भात फेसबुकवर व्हिडीओ संदेश द्वारे विनंतीवजा आवाहन केलं आहे.

“खूप लोकांना वाटतयं की ताईंची भेट घ्यावी, वाढदिवसाला काहीतरी करावं. ताईची नजर त्यावर पडावी, ताईनी ते पहावं. पण प्रत्येकापर्यंत मला पोचणं शक्य नाही, त्यातच राज्यात अतिवृष्टी होत आहे, शेतकरी चिंतित आहे, राजकीय उलथापालथ होत आहे, त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, यावेळी मला क्षमा करावी. राजकीय नेत्यांनी, सेलिब्रेटींनी वाढदिवस मोठया प्रमाणात साजरा करणं, त्यात दंगा करणं याचं समर्थन करत नाही. पण राजकीय जीवनात काम करताना कार्यकर्त्यांना आवडणार्‍या गोष्टी कधी कधी कराव्या लागतात. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते मी केलंही पण त्यात मला कुणाचं समाधान करता आलं नाही. फुल आणली जातात, तुडवली जातात, गर्दी होते, एखाद्या मोठया व्यक्तीला धक्के बसतात. असं माझ्या वाढदिवसाला होऊ नये असं मला वाटतं. अशा प्रसंगात प्रत्येकाचं मी समाधान नाही करू शकत. त्यामुळे मी आपणांस विनंती करते की, मला वाढदिवसाला भेटायला कुणीही येऊ नये. फुल, हार यावर खर्च करू नये.जर करायचेच असेल तर चांगले उपक्रम राबवा. एखाद्या गरीब मुलीला शिक्षणासाठी दत्तक घ्या, रूग्णाला उपचारासाठी मदत करा, वृध्द, अनाथ, निराधार व्यक्तिला मदत करा या गोष्टी करा जेणेकरून त्यातूनच तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील. समाजाला उपयोगी असं कुठलंही काम तुम्ही करावं, हिच खरी माझेसाठी शुभेच्छा असेल.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या उपक्रमाचा भाग व्हा

तुम्हाला तुमच्या ठिकाणी काय करायचे याचे फ्रिडम यावेळी मी तुम्हाला देते, त्यासाठी माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. जिथे करताय तिथे साधेपणाने करा. जे व्यक्त करायचे ते साधेपणाने व सेवेच्या माध्यमातून करा अशी विनंती आहे. अनेक उपक्रम मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमार्फत करतच असते, त्याचाही भाग तुम्हाला होता येईल.वाढदिवसाला मोठा हार, बुके, केक आणण्यापेक्षा प्रतिष्ठानच्या सेवा उपक्रमात सहभागी झालात तर ती सुध्दा माझ्यासाठी मोठी भेट असेल. मी पुन्हा एकदा विनंती करते, ही विनंती सर्वांना सारखी असेल, याला कुणीही अपवाद नाही अगदी माझ्या जवळचा सुध्दा..नाहीतर त्या लोकांवर अन्याय होईल जे माझेवर एवढं प्रेम करतात. हा नियम सर्वासाठी आहे. जिथं आहात तिथूनच शुभेच्छा द्या, मोठे असाल तर आशीर्वाद द्या आणि सेवेचा उपक्रम राबवा.” असं पंकजाताईंनी म्हटलं आहे.
••••

Exit mobile version