Site icon लोकाशा-बंब न्यूज

शाळेत 3 वर्षांपासून गैरहजर राहणाऱ्या शिक्षकाला सीईओंचा दणका, “त्या” शिक्षकाला सेवेतून थेट केले बडतर्फ

बीड, सन २०१९ पासून शाळेवर गैरहजर असलेल्या भांडारावाडी (ता. बीड) जिल्हा परिषद शाळेतील अनिल संतराम इंगोले या शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ही कारवाई केली.

नेकनूर केंद्रातील भांडारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर इंगोले हे ९ फेब्रुवारी २०१९ पासून अनधिकृत गैरहजर आहेत. त्यामुळे त्यांना सुरुवातीला जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना निलंबन काळात सारणी (ता. केज) येथील हनुमाननगर शाळेत पदस्थापना दिली होती तिथेही ते रुजू झाले नाहीत.

त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती. ते विभागीय आुयक्तांकडेही चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने त्यांची एकतर्फी सुनावणी झाली. त्यांना अंतिम संधीही दिली होती. मात्र, ते रुजू झाले नाहीत. त्यांच्या चऱ्हाटा या मूळगावी जाऊन मुख्याध्यापकाने त्यांचा शोध घेतला ते मिळून आले नाहीत. ते इथे राहत नसल्याबाबत पुतण्यासह ८ जणांचे जबाब नोंदवले होते.त्यांना सेवेची आवश्यकता नाही असे समजून त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव तयार केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या प्रस्तावावरून अनिल इंगोले यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून बडतर्फ केले.

Exit mobile version