Site icon लोकाशा-बंब न्यूज

नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या सुधारित खर्चास राज्य सरकारने दिली मान्यता, पंकजाताई,खा.प्रितमताईंनी मानले राज्य सरकारचे आभार, महाविकास आघाडीमुळे रखडले होते काम ; आता रेल्वेमार्गाचे काम अधिक गतीने होणार

बीड । दिनांक २० ।
नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने दिलेल्या मान्यतेमुळे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या निधीची पूर्तता होणार असून रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी या निर्णयासाठी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.अभिनंदन बीड जिल्ह्याचे आणि आभार राज्य सरकारचे अशा भावना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रगती योजनेत समाविष्ट असलेला आणि प्रत्येक बीडकरासाठी जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प राज्य आणि केंद्र सरकारच्या समान भागीदारीने उभारला जातो आहे, राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने प्रकल्पासाठी आवश्यक निधीची वेळोवेळी पूर्तता केल्याने हा प्रकल्प गतीने पूर्णत्वाकडे वाटचाल करत होता परंतु मध्यंतरीच्या काळात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने निधीची वेळेत पूर्तता न केल्यामुळे प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले आणि प्रकल्पाची वाढ खुंटली होती. राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात येताच राज्य सरकारने केंद्र सरकारच्या ४८०५ कोटीच्या ५० टक्के राज्याच्या हिस्स्याच्या सुधारित खर्चास मान्यता दिली असून २४०२.५९ कोटी इतका निधी प्रकल्पासाठी मिळणार आहे.सुधारित खर्चास मिळालेल्या मान्यतेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे स्वप्न असलेला हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे.

राज्य सरकारचे आभार ; प्रकल्पाला गती मिळेल

रेल्वे प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यानंतर पंकजाताई मुंडे व खा.प्रितमताई मुंडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.हा प्रकल्प आम्हा सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे,यापूर्वीही राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने प्रकल्पासाठी वेळोवेळी निधीची पूर्तता केली होती.मध्यंतरी महाविकास आघाडीच्या सरकारने निधीची वेळेत पूर्तता न केल्यामुळे प्रकल्पाला खीळ बसली होती, परंतु सुधारित खर्चास मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या कामात बसलेली खीळ निघणार असल्याची प्रतिक्रिया खा.प्रितमताई मुंडे यांनी दिली व या निर्णयाचे स्वागत केले.
••••

Exit mobile version