Site icon लोकाशा-बंब न्यूज

दगडाने ठेचून बीडमध्ये तरूणाची हत्या, हत्या करणार्‍या आरोपीला पेठ बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या


बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : शहरातील खंडेश्वरी भागात मित्रांच्या भांडणात एका तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. दगडाने ठेचून खून केल्यानंतर आरोपी तरुण हा घटनास्थळीच हजर होता. पेठ बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने मयताला मोबाईल विक्री केला होता, त्याचे पैसे त्याने दिले नाही, यावरूनच ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
उत्तरेश्वर उर्फ पश्या हौसराव भोसले (रा. नूर कॉलनी गांधीनगर बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे तर मारेकरी असलेल्या तरुणाचे नाव दीपक संतोष भोरे (वय 19 रा . खडकपुरा पेठ बीड) असे आहे. पश्याची हत्या केल्या नंतर तो घटनास्थळी होता. पेठ बीड पोलिसांनी त्याला तेथूनच ताब्यात घेतले. पश्या भोसले हा आपल्या मित्रांसोबत खंडेश्वरी भागात दुपारी गेला होता. त्या ठिकाणी या सर्वांनी नशापान केले. यावेळी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर पश्याच्या डोक्यात दगड घालून त्याला मारहाण करण्यात आली. यामध्ये तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मारेकरी तरुण दीपक भोरे हा तेथेच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version