अंबाजोगाई, दि. 12 (लोकाशा न्यूज) तालुक्यातील भावठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णासोबत आलेल्या दोघांनी केंद्रातील आरोग्य सहाय्यक महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. आरोपित एका महिलेचा समावेश आहे.
सुनंदा रामभाऊ वाघमारे (रा. नागझरी परिसर, अंबाजोगाई) या सध्या भावठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.09) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्या रुग्णाला तपासून आरोग्य केंद्राकडे परत येत होत्या. केंद्राच्या बाहेर एका रुग्णासोबत आलेले अर्जुन शिवाजी शेंडगे आणि रुक्मिणी शिवाजी शेंडगे (दोन्ही रा. भावठाणा) यांनी आमच्या रुग्णाला बघ म्हणत सुनंदा यांना जातीवाचक शिवीगाळ करत चापट, चपलाने मारले. यावेळी सरपंच लताबाई कापसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांनाही जुमानले नाही. अखेर अन्य काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. याप्रकरणी सुनंदा वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अर्जुन शेंडगे आणि रुक्मिणी शेंडगे यांच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा आणून कर्मचार्यास मारहाण आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
आरोग्य केंद्रातील महिला कर्मचार्यास मारहाण; दोघांवर अॅट्रॉसिटी
