Site icon लोकाशा-बंब न्यूज

मी-मी म्हणणार्‍यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे-आ.संदीप क्षीरसागर, न.प.निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची बैठक; इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून

बीड (प्रतिनिधी):- वेळ सापडुन दगा देणार्‍या आणि खोटे आश्वासन देवून भूमिका बदलणार्‍या तसेच मी-मी म्हणणार्‍या लोकांना उत्तर देण्याची वेळ नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. त्यांना आपण योग्य उत्तर द्यायचे आहे असे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवार दि.11 जुलै रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या बीड शहर कार्यकर्ता व पदाधिकारी बैठकीत बोलतांना म्हटले. ही बैठक नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नगर परिषदेच्या निवडणुका जाहिर होताच दुसर्‍या दिवशीच आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी उषाताई दराडे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगर परिषद निवडणुकीचे नियोजन करणे संदर्भात उपस्थित नेत्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी, या निवडणुकीसाठी आपण 40 दिवसांच्या नियोजनाचा आराखडा तयार केला असून या नियोजनातून सर्वच्या सर्व उमेदवार निवडुण येणार असल्याचा विश्वास कार्यकर्ते व पदाधिकारी यांना दिला. तसेच आमदारकीच्या निवडणुकीसाठी जेवढा आतुर नव्हतो तेवढा या निवडणुकीची वाट पाहून होतो असे सांगितले. या निवडणुकीतून आपल्याला सिद्ध व्हायचे आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे अडचणीच्या काळात साथ दिलेली आहे, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत अशांना यावेळी संधी देवून न्याय देण्याचे काम होणार आहे. ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांनी पुढील निवडणुकीसाठी जोमाने तयारी करावी.असेही यावेळी सांगितले.या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनील धांडे, माजी आ.उषाताई दराडे,जेष्ठ नेते ॲड.डी.बी.बागल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, वैजनाथ तांदळे यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट
इच्छुक उमेदवारांच्या आजपासुन मुलाखती

दरम्यान इच्छुक उमेदवारांना बैठकीनंतर फॉर्मचे वितरण करण्यात आले. आजपासुन या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. आज दि.12 जुलै 2022 रोजी प्रभाग क्र.3,4,5,19,20,21,22,23,24,25 येथील इच्छुकांच्या तर दि.13 जुलै रोजी प्रभाग क्र.2,6,7,8,16,17,18 व दि.14 जुलै रोजी प्रभाग क्र.1,9,10,11,12,13,14,15,26 येथील उमेदवारांची मुलाखत होणार आहे.

चौकट

न.प.बीडच्या निवडणुकीत ओबीसीला २७ टक्के आरक्षण

राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने नुकत्याच अवलंब केलेल्या धोरणानुसार बीड नगरपरिषद निवडणूकीत २७ टक्के ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याचेही बैठकीदरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

Exit mobile version