अंबाजोगाई – क्रेडीट कार्ड बंद करण्यासाठी भामट्यांनी नोकरदार महिलेस ‘एनी डेस्क’ नावाचे मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेला विश्वासात घेत त्या ॲपच्या माध्यमातून क्रेडीट कार्डवरून २ लाख १६ हजार ३३२ रुपये काढून घेत तिची फसवणूक केल्याची घटना शनिवारी (दि.०९) अंबाजोगाई शहरात घडली.
उषा पांडुरंग गायकवाड (रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) असे त्या फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या अंबाजोगाईतील नागरी रुग्णालयात अवैद्यकीय सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या मोबाईलवर कॉल करून भामट्यांनी एसबीआय बँकेतून बोलत असून क्रेडीट कार्डवर ऑफर असल्याचे सांगितले. यावेळी उषा यांनी क्रेडीट कार्ड नको आहे, ते बंद करायचे आहे असे सांगितले. त्यावर भामट्यांनी कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून कार्ड डीटेल्स घेतले आणि ‘एनी डेस्क’ नावाचे मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. डाउनलोड झालेल्या ॲपच्या माध्यमातून भामट्यांनी उषा यांच्या मोबाईलचा ताबा घेत त्याद्द्वारे क्रेडीट कार्डमधून एकूण २ लाख १६ हजार ३३२ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उषा यांनी पोलिसात द्धव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी भामट्यांवर अंबाजोगाई शहर ठणय्त फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.