परळी वैजनाथ दि ६ ( लोकाशा न्युज ) :- शहरातील संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे आणि टीमने इटके कॉर्नर येथे धडाकेबाज कारवाई करीत डाक पार्सल या गोंडस नावाखाली एका कंटेनर मध्ये साडेदहा लाख रुपयाचा गुटखा व गुटखा वाहतूक करणारे नऊ लाख रुपयाचे कंटेनर असा एकूण १९ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धडाकेबाज कारवाईबाबत संभाजीनगर पोलिसांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ही कारवाई दि. ६ जुलै २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे.
याबाबत संभाजीनगर पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, आज पहाटे डाक पार्सल असे लिहिलेल्या एका कंटेनर मधुन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत मोठ्या प्रमाणात होत असल्याची संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना एका खबर्याकडून मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःसह पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, डीबी शाखेचे सचिन सानप, विलासबप्पा देशमुख, मुजमुले यांच्यासह सापळा रचला आणि सदरचे टँकर शहरातील इतके कॉर्नर या ठिकाणी येताच मोठ्या शिताफीने पकडला. या कारवाईत प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला २८ पांढऱ्या रंगाचे बोरे असा एकुण १० लाख ४८ हजार रुपयाचा मुद्देमाल तसेच डाक पार्सल असे लिहिलेले लाल फीकट रंगाचे कंटेनर ९ लाख रुपये असा एकूण १९ लाख ४८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे बीबी शाखेचे सचिन सानप यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपी विरुद्ध गुरन १३१/२०२२ कलम ३२८, २७२, २७३ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटेनर चालक सरफराज अहेमद दारुद वय ३५ वर्ष रा. तपकन ता. नुहु, जि. मेवाड, राज्य हरीयाणा यास मुद्देमालासह (कंन्टेनर पासींग क्र.एच.आर. ५५ / टी-४२७१) अटक केली आहे.
संभाजीनगर पोलिसांच्या ह्या धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून अशा प्रकारची धडाकेबाज कारवाई केल्यामुळे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्यासह चांद मेंडके, डीबी शाखेचे सचिन सानप, विलासबप्पा देशमुख, आणि मुजमुले आदींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.