Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुढच्या आठवड्यात नव्या सरकारचे मंत्रिमंडळ ठरणार, गृह,अर्थ, महसूल भाजपकडे तर बांधकाम, नगरविकास शिंदेंकडे



मुंबई, दि. 6 (लोकाशा न्यूज) : राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार आहे. गृह,महसूल,अर्थ ही खाती भाजपकडे तर नगरविकास, बांधकाम,कृषी ही खाती शिंदे यांच्या शिवसेना गटाकडे राहतील अशी माहिती आहे. 12 किंवा 13 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल.6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी रचना असेल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेत आतापर्यंतची सर्वात मोठी बंडाळी झाली आहे. शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उभी फूट पाडत 40 आमदार आपल्या बाजूला वळवले आहेत. त्यानंतर या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेले महाविकास आघाडी सरकार पाडले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून देवेंद्र फडणवीस हे नाट्यमयरीत्या उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 12 किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला मिळणार आहे. भाजपकडे गृह, अर्थ, महसूल खाते जाण्याची शक्यता आहे. तर, शिंदे गटाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. वर्ष 2014 ते 2019 दरम्यानच्या काळात भाजप-शिवसेना युतीच्या काळात गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते भाजपकडे होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृह खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे, महसूल खाते काँग्रेसकडे, नगरविकास खाते शिवसेनेकडे होते. दरम्यान, याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपला या सूत्रानुसार 28 मंत्रिपदे मिळणार आहेत.
Exit mobile version