Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडेंनी आष्टीतून फुंकले जि.प. निवडणूकीचे रणशिंग,जिंकण्यासाठी कामाला लागा ; जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा आपलीच सत्ता

आष्टी ।दिनांक २१।
जिल्हयातील सत्ताधाऱ्यांकडून जनतेची घोर निराशा झाली आहे. कुठला निधी नाही की कामे नाहीत, त्यामुळे त्यांना मतदान करण्याची मानसिकता मतदारांमध्ये राहिली नाही. तुमच्यासाठी मी रणांगणात उतरले आहे, जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. जिल्हा परिषदेत पुन्हा आपलीच निर्विवाद सत्ता येणार आहे असा दृढ विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे व्यक्त केला.

आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोक प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक आज लक्ष्मी मंगल कार्यालयात मोठया उत्साहात संपन्न झाली, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार भीमसेन धोंडे, आमदार सुरेश धस यावेळी उपस्थित होते. या बैठकीत पंकजाताईंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.

आष्टी हा जिल्हयात सर्वाधिक ताकदीचा मतदारसंघ आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी मी इथून सुरू करत आहे. लोकनेते मुंडे साहेबांचं नांव जस गावागावात झालं तसं कामाच्या माध्यमातून प्रत्येक गावात पोचण्याचा मी प्रयत्न केला आहे. पालकमंत्री म्हणून सत्तेच्या काळात कामं करताना जातीसाठी नाही तर मातीसाठी काम केलं. कुठलाही भेदभाव केला नाही. ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज या मुलभूत समस्यांसह विविध विकास कामे केली. शेतकरी वर्ग माझ्या काळात आनंदी होता, पण आज परिस्थिती उलट आहे. सत्ताधाऱ्यांचे जिल्हयाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. माझ्या काळात जो निधी आला, त्याचीच कामे आणि उदघाटने आजही सुरू आहेत. विम्याचा तसेच वीज बिल वसुलीचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकरी चिंतातूर आहे. माझा विरोध अथवा टिका ही कधीही एखाद्या व्यक्ती विरूध्द नाही तर प्रवृत्ती विरूध्द आहे. सत्ताधाऱ्यांना संधी देऊन पाहिली पण त्यांना काही करता आले नाही. आज जिल्हयात सर्वच बाबतीत जी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे ती अधिक चिंताजनक असल्याचे पंकजाताई म्हणाल्या.

प्रत्येक गटात जाणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपण पूर्ण लक्ष घालणार आहोत, त्यासाठी प्रत्येक गटाचा दौरा करणार आहे असं पंकजाताई म्हणाल्या. सर्वाना एकत्रितपणे काम करावं लागेल. विरोधकांना आगामि विधानसभा निवडणुकीत प्रचाराला सुध्दा माणूस मिळाला नाही पाहिजे. निवडणुकांना जिंकण्याच्या इर्षेने यशस्वीपणे कामाला लागा असं आवाहन त्यांनी केलं.

यावेळी धोंडे व धस यांनी दोघं मिळून पंकजाताईच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात आणू असा विश्वास दिला. पंकजाताई पालकमंत्री असताना झालेली कामे उल्लेखनीय होती आता तशी कामे होत नाहीत. सत्ताधारी केवळ टक्केवारीच्या मागे लागलेत असा घणाघात आ. धस यांनी केला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजय गोल्हार, वाल्मिक निकाळजे, बबन अण्णा झांबरे, रामराव खेडकर, दशरथ वनवे, जयदत्त धस, अजय धोंडे, राम कुलकर्णी, अमोल तरटे, सुवर्णा लांबरूड, उषाताई मुंडे, सविता गोल्हार, मधुकर गर्जे, सुधीर घुमरे आदींसह असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीचे संचलन शंकर देशमुख यांनी केले.
••••

Exit mobile version