Site icon लोकाशा-बंब न्यूज

माझा संयम लेचापेचा नाही ; कार्यकर्त्यांची मला काळजी – पंकजाताई मुंडे,मोहटादेवी मंदिरात दर्शनानंतर साधला उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद

पाथर्डी । दिनांक २१।
गेल्या आठ दिवसापासून निर्माण झालेल्या परिस्थितीत माझ्याबद्दल जे विचार मांडले गेले ते सर्व सकारात्मक होते त्यांचे आभार मानते. माझ्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे. माझा संयम लेचापेचा नाही आणि एखाद्या क्षुल्लक कारणाने मी डगमगणार देखील नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिरात दर्शनानंतर तेथे उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर पंकजाताई मुंडे यांनी दुपारी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, जे हार मुंडे साहेबांच्या सत्कारासाठी आणले होते ते हार त्यांच्या अंत्यविधीला वापरले हे पाहणारी, पचवणारी आणि आक्रमक झालेल्या जनतेला शांत करणारे मी पंकजा मुंडे आहे.

आज अहमदनगरहून इकडे येतांना किमान दहा हजार लोकांनी माझं मोठं स्वागत केलं. मला काही करायचं असेल तर 2-4 कार्यकर्त्यांनी भागणार आहे का? मला या गोष्टी करायच्या नाहीत ते माझ्यावर लोकनेते मुंडे साहेब यांनी केलेले संस्कार नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे माझ्या नेत्यांची मला काळजी आहे.

आता पंकजा मुंडे काय करणार? असा सर्वांना प्रश्न पडला, मात्र कोणाला संधी मिळाल्याने त्याचा तिरस्कार करणे हे माझ्यावरचे संस्कार नाहीत ज्यांना मिळाले त्यांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद… पण मला एक या गोष्टीचं वाईट वाटतं की तुमची मनातली घालमेल असल्याने तुम्ही प्रत्येक जण मला फोन करत होता पण मी तुमची क्षमा मागते तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं तुमच्या सोबत मी कायम राहील असं त्या म्हणाल्या.

जनतेच्या प्रेमाची उतराई नाही

बहुमत नसतानाही आम्ही निवडणुका जिंकलो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे शंभर-सव्वाशे मत होती, मात्र ७५ मत जास्त घेऊन आम्ही निवडणूक जिंकलो. जिल्हा परिषद, पंचायत समित्या देखील आम्ही अशा ताब्यात घेतल्या. आता निवडणूका येत असतात, जात असतात मात्र प्रेम करणाऱ्या लोकांची कधीही प्रतारणा केली नाही, त्यांच्या प्रेमाची उतराई होणे कधीही शक्य नाही.मी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले. सगळ्याच लढाया करून जिंकायचे नसते काही तह करायचे असतात. तह करणे म्हणजे पराजित होणं नाही असंही पंकजाताई म्हणाल्या.
••••

Exit mobile version