अहमदनगर । दिनांक २१।
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील वंचित, अनाथ मुलांसमवेत योगदिन साजरा केला. योग ही आपल्या देशाची संस्कृती आहे, मन स्वास्थ्यासाठी नियमित योगाभ्यास महत्वाचा आहे असं त्या म्हणाल्या.
पंकजाताई मुंडे यांचे काल रात्री शहरात आगमन झाले. आज सकाळी त्यांनी शहरातील स्नेहालय संस्थेला भेट दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत आज योग दिन साजरा करण्यात आला. संस्थेतील अनाथ, वंचित मुलं-मुली यात सहभागी झाले होते. या सर्वांसमवेत पंकजाताईंनी योगाभ्यास केला.
प्रारंभी स्नेहालय संस्थेचे संचालक
गिरीश कुलकर्णी व संचालकांनी पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेने ‘अग्निशिखा’ मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.
योग ही भारताची संस्कृती
योग ही भारताची संस्कृती असून जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. आज जगातील जास्तीत जास्त लोकांनी याचा अंगीकार केलायं. योग हे आपल्या आरोग्याचं साधन असून याची सर्वांनी साधना करण्याची गरज आहे. औषधं हे शरीराचा इलाज करतात पण मन स्वास्थ्यासाठी नियमित योगाभ्यास महत्वाचा आहे असं पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे आदी उपस्थित होते.
••••