बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्याचे सुत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शुक्रवारी बीडमधील तर शनिवारी लागलीच जिल्ह्यातील नेकनूर, केज, युसूफवडगांव, धारुर, अंबाजोगाई, परळी, बर्दापूर पोलीस ठाण्यांना अचानक भेटी देत तेथील कामकाजाची पाहणी केली. न्यायाची भुमिका ठेवून काम करा, असे आदेश यावेळी ठाकूर यांनी सर्वच ठाणेदारांना दिले. तसेच सामाजिक ऐकोपा टिकवण्याबाबत गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे, अवैध धंदे शंभर टक्के बंद असणे याला महत्व देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या तीन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याचे सुत्र हाती घेणारे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शुक्रवारी बीडमधील शिवाजीनगर, बीड शहर, पेठ बीड, बीड ग्रामीण ठाण्यांना तर शनिवारी भल्या सकाळीच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेट देण्यासाठी बाहेर पडणे पसंत केले. सर्वात सुरूवातीला नेकनूर पोलीस ठाण्यात भेट देवून तेथील कामाची पाहणी करत पोलीसांच्या अडीअडचणीसह परिसराची माहिती घेतली. पुढे ते केज, धारुर, युसूफवडगांव, अंबाजोगाई, बर्दापूर, परळी पोलीस ठाण्याना भेटी देणार आहे. याबाबत थेट नंदकूमार ठाकूर यंाच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या भेटीत पोलीस स्टेशनच्या कामकामाजासह जिल्ह्याची माहिती घेत आहे. जिल्ह्याची भौगोलीक, सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेणे महत्वाचे आहे असं म्हणत नूतन पोलीस अधिक्षकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी जिल्ह्यातील गुन्हांचा आढावा घेतला. वेळेवर गुन्हे निकाली काढा, व्यवस्थित काम करून घ्या, परिसर स्वच्छ ठेवा, तक्रारदारास वेठीस धरू नका, म्हणजेच न्यायाची भुमिका ठेवून काम करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. दरम्यान त्यांनी दिलेल्या या अचाणक भेटीमुळे बीड जिल्हा पोलिस प्रशासन अर्लट झाले होते.