Site icon लोकाशा-बंब न्यूज

गर्भपातातील एजंट अंगणवाडी सेविका मनिषा सानपला तडकाफडकी केले निलंबित, झेडपीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी केली कारवाई  


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : बीडमध्ये गर्भपाताचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यामध्ये गुन्हे दाखल होऊन चौघा जणांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. बीडच्या गर्भपाताचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत असून पोलीसांचे एक पथक औरंगाबादेत तळ ठोकून होते. तर या प्रकरणातील एजंट असलेली अंगणवाडी सेविका मनिषा सानप हिला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
बीड तालुक्यातील बकरवाडी येथील शीतल गणेश गाडे या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मयत महिलेचा पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबुराव गाडे (दोघे रा. बकरवाडी ता. बीड), मयत महिलेचा भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनिषा शिवाजी सानप (रा. अर्धमसला ता. गेवराई), प्रयोग शाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड) आणि सीमा सुरेश डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सीमा डोंगरे यांचा मृतदेह बिंदुसरा धरणात आढळून आला. तर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता यातील आरोपी अंगणवाडी सेविका मनिषा शिवाजी सानप हिला एमसीआर मिळाला. पीसीआरमध्ये असलेल्या आरोपींच्या चौकशीनंतर याचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत निघत असल्याने समोर येत आहे. त्याअनुषंगानेच बीडचे एक पथक औरंगाबादमध्ये तळ ठोकून होते. विशेष म्हणजे या प्रकरणातील एजंट असलेली अंगणवाडी सेविका मनिषा सानप हिला जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या अंगणवाडी सेविकेकडे 29 लाख रूपयांची रोकड आढळून आली होती. तिच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असून ही मालमत्ता नेमकी कुठून आणि कशी जमविली याविषयी चौकशी होणार आहे.

Exit mobile version