Site icon लोकाशा-बंब न्यूज

अवैध गर्भपातप्रकरणी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात

बीड : अगोदरच स्त्रीभ्रूण हत्येने बदनाम झालेला बीड जिल्हा पुन्हा एकदा अशाच कारणाने चर्चेत आला आहे. पहिल्या तीन मुली असलेल्या महिलेचा चौथ्यांदा गर्भ राहिल्याने रविवारी मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता, हा मृत्यू गर्भपातामुळेच झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात गर्भलिंग निदान करून गर्भपात झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पोलिसांनी पतीसह इतर नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे.

सीताबाई उर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. शीतल या ऊसतोड मजूर असून, त्यांना अगोदरच ९, ६, आणि ३ वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले. याचा अहवाल प्राप्त झाला असून, हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काय आढळले होते अहवालात?
मयत महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र पडलेले होते, तसेच आत अर्भक नव्हते. महिलेचा गर्भ १८ आठवड्यांचा होता. गर्भाशी छेडछाड झाल्याने पोटातच दीड लिटर रक्तस्त्राव व बाहेर अंदाजे पाच लिटर रक्त गेले होते. रक्ताने कपडे भिजलेले होते. शस्त्रक्रियागृहातील टेबलवर रुग्णाचे कपडे, अंग खराब होऊ नये म्हणून पॉलिथिन शीट टाकले जाते. त्याचे तुकडे महिलेच्या पाठीला चिटकलेले होते. या व इतर काही महत्त्वाच्या वैद्यकीय मुद्द्यांवरून हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले. तसेच नातेवाईकांनीही बोलण्यास नकार दिल्याने यात संशय आणखीनच बळावला आहे.

सुदाम मुंडे मुळे अगोदरच बदनामी
जिल्हा अगोदरच सुदाम मुंडे सारख्या नराधमामुळे बदनाम झाला होता. स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात त्याला शिक्षाही झाली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्र पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात असे प्रकार थांबले होते. परंतु, रविवारच्या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा बदनाम झाला आहे.

Exit mobile version