Site icon लोकाशा-बंब न्यूज

पालकमंत्री, आमदार माझ्या खिशात, कार्यकारी अभियंत्याची मुक्ताफळे, अभियंत्यांच्या भ्रष्ट कारभाराला सर्वच जण कंटाळले


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : अंबाजोगाई येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने मनमानी कारभाराचा कळस केला असून आता तर जिल्ह्याचे पालकमंत्री, माजलगावचे आमदार हे आपल्या खिशात आहेत अशी मुक्ताफळे हे महाशय उधळत आहेत. गेल्या पाच महिन्यात सदर अभियंत्याच्या भ्रष्ट कारभाराला या भागातील कंत्राटदार सुध्दा वैतागले असून त्याचा परिणाम विकास कामांवर होवू लागला आहे.
या संदर्भात काही जबाबदार नागरिक आणि कंत्राटदारांनी राज्याचे मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री आदिंना सदर कार्यकारी अभियंत्याच्या कारभारा विषयी अनेक गंभीर तक्रारी केल्या आहेत. अंबाजोगाई येथे रुजू झाल्यापासून या अधिकार्‍याने सुरुवातीला जिल्ह्याची बदनामी करण्याची मोहिम राबवली. ज्यामुळे एक प्रकारे सरकारला आणि पालकमंत्र्यांना तोंडावर पाडण्याचा प्रकार झाला.त्यानंतर या विभागात सुरु असलेल्या सार्वजनिक विकासाच्या कामांमध्ये खोडा घालणे,कंत्राटदाराला जाणिवपुर्वक त्रास देणे,निधी उपलब्ध असताना कंत्राटदारांची बिले काढण्यासाठी कमिशनची मागणी करणे, मानसिक आणि आर्थिक कोंडी करणे. अशा कारभारामुळे अंबाजोगाई विभागातील विकास कामांवर गंभीर परिणाम होवू लागले आहेत. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असताना बांधकाम विभागाची यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली असल्यामुळे प्रत्यक्ष विकास जनतेपर्यंत पोहचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. या संदर्भात अनेक तक्रार केल्यानंतरही सदर अभियंत्याने जिल्ह्याचे पालकमंत्री, माजलगावचे आमदार आपल्या खिशात आहेत अशी मुक्ताफळे उधळली.

Exit mobile version