Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुंडे साहेबांचं जीवन संघर्ष, साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम – मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान,ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा ; मार्ग निघतोच, सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया – पंकजाताई मुंडे, लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!

परळी वैजनाथ ।दिनांक ०३।
लोकनेते गोपीनाथ मुंडे म्हणजे अविरत संघर्ष, साहस आणि वंचित घटकांची सेवा याचा त्रिवेणी संगम आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गोपीनाथगडावर केले. ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा, मार्ग निघतोच असा सल्ला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. तर सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे, उद्या काय मिळणार? याची चिंता मला नाही पण दिलेल्या संधीचं सोनं करणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गड येथे आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. या समारंभात विविध क्षेत्रातील वंचित, पिडित घटकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “संघर्षदिन सन्मान” म्हणून सम्मान करण्यात आला. प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर, कविता वाघ यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले, मी आज गोपीनाथ गडावर भाजपाचा नेता किंवा मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर स्वर्गीय मुंडे यांचा भाऊ म्हणून उपस्थित आहे. भाजपाचे मजबूत संघटन आज देशभरात दिसून येते या संघटनाला महाराष्ट्राच्या गावागावांत पर्यंत पोहचवण्याचे कार्य स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी केले. मध्यप्रदेशमध्ये काम करताना सर्वप्रथम प्रमोद महाजन यांनीच आपल्याला अध्यक्ष म्हणून पक्षात संधी दिली आणि मुंडे-महाजन यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. अगदी जवळून मी या दोघांचेही काम पाहिलेले आहे. वंचित, उपेक्षित ,पिडीत घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी जीवनभर केले. गोपीनाथ मुंडे स्वतः गरीब परिवारातून आल्याने गरीबीच्या झळा अनुभवतच त्यांनी राजकारणात गरिबांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी अविरत संघर्ष केला. गोरगरिबांना न्यायासाठी ते जेवढे प्रेमळ होते तेवढेच गुंडशाही झुंडशाहीच्या विरुद्ध वज्राप्रमाणे कठोर होते ते त्यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना दाखवून दिले आहे. संघर्ष, साहस व सेवा हा त्रिवेणी संगम या लोकनेत्यामध्ये नक्कीच बघायला मिळतो. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊनच जनकल्याणाचे कार्य अविरत त्यांच्या मुली करत असल्याचे कौतुकास्पद आहे. आपण सारे मिळून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जनसेवेचा हा वारसा निश्चित पुढे चालवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ओबीसींसाठी इच्छाशक्ती दाखवा

ओबीसी आरक्षणाच्या विषयावर बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले, मध्य प्रदेशात ओबीसींना आरक्षण द्यायचेच असा आपला ठाम निर्धार होता.न्यायालयांमध्ये यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन बाजू मांडली. आयोग, प्रशासन व स्वतः दिवस-रात्र एक करून ओबीसींना आरक्षण मिळवून देईपर्यंत आपण स्वस्थ बसलो नाही. मनातून काही द्यायचे असेल तर ती तडफ आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर निश्चित मार्ग निघतो. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचा नक्कीच विचार करावा असा चिमटाही त्यांनी भाषणात बोलताना काढला. पंकजा मुंडे या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांना जपा, त्यांच्यामागे पाठबळ उभे करा, निश्चितच पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणेच जनसेवेचा वारसा पुढे चालू राहील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

माझं राजकारण सत्व, तत्व, ममत्वाचे – पंकजाताई

‘सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. अनेकजण मला विचारतात की आता काय? पण माझी चिंता करु नका. उद्या काय होणार, काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं यापेक्षा काय हवं. या पराभवानं मला दिल्लीला नेलं. शिवराजसिंहांसारखे सात्विक लोक लाभले’. ‘ज्यांच्या नावातच शिव आणि जनतेच्या मनात ज्यांचं राज आहे अशा शिवराजसिंह चौहान यांचं मी स्वागत करते. सकाळपासून लोक तुमच्या प्रतिक्षेत आहे. तुमचं आमचं नातं मुंडे साहेबांपासून आहे. इथे तुम्ही मुंडे साहेबांच्या अंत्यविधीला आला होता. त्याच ठिकाणी आज तुम्ही आला आहात. तुम्ही मध्यप्रदेशात जी किमया करुन दाखवली, जे इतर कोणत्याही राज्याला जमलं नाही. तुम्ही ओबीसी आरक्षण टिकून धरलं. महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी, प्रेरणा लाभो. शिवराजसिंह चौहान यांची प्रेरणा घेऊन त्यांनी ओबीसींची आरक्षण मिळवून द्यावं. राजकारणासाठी नाही तर ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण हवं, असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या.

‘जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला’

गरीब आणि वंचितांचे नेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यासोबत नाहीत. पण आज शिवराजसिंहांसारखे लोक आमच्यासोबत जोडले जातात. तेव्हा आजही म माझ्या वडिलांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं. आज मला त्या दिवसाची आठवण येते. आज 8 वं पुण्यस्मरण आहे मुंडे साहेबांचं. मोदी सरकारलाही 8 वर्षे झाली आहेत. जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला. हा गोपीनाथ गड माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी आहे जे सकाळपासून तुमची वाट पाहत आहेत. मी मध्यप्रदेशची प्रभारी असेन नसेन पण तुमच्याशी जोडलेले आमचं नातं कायम राहील, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

क्षणचित्रे

• सकाळी ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचं सुश्राव्य कीर्तनाचा उपस्थित हजारो लोकांनी लाभ घेतला.

• लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध रितीने मुंडे भक्तांनी समाधीचे दर्शन घेतले.

• वातावरणात प्रचंड उकाडा असतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनसागर लोटला, त्यातही महिलांचा सहभाग लक्षवेधी

• मुख्यमंत्री चौहान यांचे दुपारी 3.40 वा. मध्यप्रदेश शासनाच्या विशेष हेलिकॉप्टरने गडावर आगमन. पंकजाताई मुंडेंकडून स्वागत

• गडावर येताच मुख्यमंत्र्यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

• बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत केलेल्या सत्काराने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान भारावून गेले महिलांनी दिलेला पट्टा त्यांनी कार्यक्रम पुर्ण होईपर्यंत काढला नाही.

• पंकजाताई मुंडे यांनी स्वतः किर्तनात सहभाग घेऊन हरिनामात तल्लीन झाल्या तर दुपारी पंगतीत वाढपी होत महाप्रसादाचे वाटप केले.

• हजारो नागरिकांनी, अबालवृध्द आणि महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पंगती बसवण्यात आल्या होत्या.

•मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पाच बालिकांचे “कन्या पूजन” करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

• मुख्यमंत्री चौहान यांचे स्वागत पंकजाताई, खा. डॉ. प्रितमताई आणि अॅड. यशश्रीताई मुंडे यांनी तुळशीचे रोप देऊन केले.

• मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पंकजाताई, प्रितमताई आणि यशश्रीताई या तिन्ही बहिणींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक हे पहिल्यांदाच असेल असे म्हटले.

• कार्यक्रमास श्रीमती प्रज्ञाताई मुंडे, आर्यमान पालवे, रासपचे महादेव जानकर, खा. सुजय विखे, भीमराव धोंडे, सुरेश धस, रत्नाकर गुट्टे, राजेश पवार, राधाताई सानप, आर टी देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के, गोविंदराव केद्रे आदींसह अनेक नेते उपस्थित होते.

• कार्यक्रमाचे संचलन ज्ञानदेव काशीद यांनी केले तर प्रवीण घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
••••

Exit mobile version