Site icon लोकाशा-बंब न्यूज

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतिदिन ; ३ जूनला अभिवादनासाठी विविध मान्यवर नेत्यांसह राज्यभरातून येणार मुंडे प्रेमी,वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती होणार सन्मानित,पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू

परळी वैजनाथ । दिनांक ०१।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनी म्हणजे येत्या ३ जून रोजी लोकनेत्याच्या अभिवादनासाठी आमदार, खासदारांसह विविध मान्यवर नेते तसेच राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर याठिकाणी उसळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मध्यंतरी दोन वर्षे कोरोना महामारीमुळे गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम होऊ शकले नव्हते.

 ३ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वा. ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे तद्नंतर दर वेळेप्रमाणे समाजातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.  सर्व आजी माजी आमदार, खासदार, मान्यवर   नेते मंडळी व कार्यकर्ते यावेळी  उपस्थित राहणार आहेत. 

सामाजिक उत्थानाचा वसा

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडला आहे. कोरोना काळात सेवा यज्ञातून दिलेला मदतीचा हात, महा आरोग्य शिबीर, अपंगाना साहित्य वाटप, बेरोजगारांना नोक-या, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत, सामुदायिक विवाह सोहळा आदी विविध उपक्रम राबवून सामाजिक उत्थानाचा वसा घेतला आहे.येत्या ३ जून रोजी होणा-या कार्यक्रमास सर्व नागरिक तसेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
••••

Exit mobile version