Site icon लोकाशा-बंब न्यूज

पतीच्या प्रेयसीच्या मुलाला नदीत बुडवून मारले;
आरोपी महिलेला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा


बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : पतीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पत्नीने त्याच्या प्रेयसीच्या साडेतीन वर्षाच्या मुलास नदीत बुडवून ठार मारले. तीन वर्षापूर्वीच्या या खळबळजनक प्रकरणात जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी त्या निर्दयी महिलेस 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

शारदा श्रीराम शिंदे (रा. शाहुनगर, बीड) असे त्या गुन्हेगार महिलेचे नाव आहे. या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, 15 वर्षापूर्वी शारदाचा पती श्रीराम शिंदे याची गढी कारखाण्यावर काम करणार्‍या एका महिलेसोबत ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्या महिलेचा पती भोळसर असल्याने श्रीराम तिला पैशाची मदत करत असे. परंतु, शारदाला हे आवडत नव्हते. त्यामुळे पती बाहेर गेल्यास शारदा वारंवार त्या महिलेला फोन करून भांडत असे. अखेर शारदाने पतीच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून त्याच्या प्रेयसीचा मुलगा सार्थक (वय 3 वर्ष 6 महिने) याचा खून करण्याचे निश्चित केले. प्रेयसीच्या घराचा दरवाजा हलवुन कडी उघडुन तिने घरामध्ये प्रवेश केला घरात झोपलेल्या सार्थकला हळूच उचलले आणि घेवून धानोरा रोड बीड ते अंकुश नगर बीड जाणारे रोड वरील पुलाजवळील करपरा नदीचे पात्रातील पाण्यामध्ये बुडवून त्याचा खुन केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने सार्थकचा मृतदेह करपरा नदीच्या पात्रात फेकून दिला. याप्रकरणी सार्थकच्या आईच्या फिर्यादीवरून शारदा उर्फ शामल श्रीराम शिंदे हिच्या विरुध्द 302, 363, 364, 449, 201 भा.द.वि प्रमाणे पो. स्टे शिवाजीनगर येथे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास एपीआय ए. एम. शेख यांनी केला. त्यांनी सदर प्रकरणात तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड यांचे, न्यायालयात झाली. सदर आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकूण आकरा साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात साक्षीदारांची साक्ष व घटनास्थळ पच यांचे पुराव्याचे अवलोकन करून व सहायक सरकारी वकील अ‍ॅड. अजय तांदळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी आरोपी शारदा शिंदे हिला दहा वर्षांचा सश्रम कारावास व 500/- दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास आणि क. 450 व 364 अन्वये 10 वर्ष कारावास व 500/- दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास शिक्षा सुनावली. सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे अजय तांदळे व ऍड. बी. एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सहा. फौजदार इंगळे यांनी सहकार्य केले.
Exit mobile version