वर्षभरात झेडपीच्या आवारात शंभूराजेंचा पुतळा बसवणार, सीईओ अजित पवारांनी शंभुप्रेमींना दिले आश्वासन, छत्रपतींच्या विचाराणे चालणे ही काळाची गरज – एएसपी लांजेवार
Lokasha Abhijeet
बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज जयंती शनिवारी (दि. 14) बीडमध्ये ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या आवारात प्रस्तावित असलेल्या शंभूराजेंच्या पुतळ्याच्या जागी त्यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अप्पर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार यांच्यासह शंभूप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आपण जिल्हा परिषद आवारात बसवित आहोत. आपण बोलण्यापेक्षा कृतीतून जास्त काम दाखवत असतो. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढील जयंतीवेळी याठिकाणी पुतळा उभारलेला असेल. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा शब्दही त्यांनी दिली. यावेळी सुनील लांजेवार म्हणाले, स्वराज्याचे धाकले धनी यांनी केवळ स्वराज्य राखले नाही तर ते वाढविले. स्वराज्य वाढविताना त्यांना मोठा संघर्षही करावा लागला. तलवारीच्या धारेवर त्यांनी स्वराज्य चालविले. पुस्तकात लिहलेला इतिहास चिकीत्सकपणे वाचणे आवश्यक असून छत्रपतींच्या विचाराणे चालणे काळाची गरज आहे. स्वराजात जशी एकी होती, सलोखा होता तसेच आपण सर्वांनी मिळून मिसळून काम करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरूवातील जिजाऊ वंदना घेण्यात आली तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व शंभूप्रेमी उपस्थित होते़