Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीईओ, एसीईओ थेट फिल्डवर जात असल्यामुळे साठ दिवसांची मोहिम होणार फत्ते, जिल्ह्यातील 1684 कोटींच्या कामांना गती, नरेगाच्या कामात बीड जिल्हा मराठवाड्यात अव्वल


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : एक सकारात्मक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेचे सीईओ तथा प्रशासक अजित पवार हे काम करीत आहेत. प्रत्येक काम गतीने झाले पाहिजे, असा त्यांचा नेहमीच मानस असतो, त्याअनुषंगानेच आता त्यांनी पुढील साठ दिवसांसाठी एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. या साठ दिवसात जिल्ह्यातील  तब्बल 27 हजार 227 कामांचा निपटारा केला जाणार आहे. यावेळी नरेगाच्या कामालाही आणखी वेगाने गती दिली जाणार आहे. यासाठी शिक्षण, बांधकाम, पाटबंधारे यासह अन्य विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वत: सीईओ अजित पवार आणि एसीईओ वासूदेव सोळंके हे दोघे प्रत्यक्ष फिल्डवर जावून कामांना गती देत आहेत. यामुळेच साठ दिवसांसाठी आखण्यात आलेली मोहिम येणार्‍या काळात फत्ते झाल्याचे संपूर्ण जिल्हावासियांना पहायला मिळणार आहे.  
जिल्हा परिषदेवर ग्रामीण भागाचा विकास पुर्णपणे अवलंबून असतो, त्यामुळे जिल्हा परिषदेला चांगला अधिकारी मिळाला तर गावागावात विकास कामे सहजपणे पोहचू शकतात, आणि ते वेळेत पुर्णही होवू शकतात, अगदी याचप्रमाणे बीड जिल्हा परिषदेला अजित पवार यांच्या माध्यमातून एक चांगले सीईओ मिळालेले आहेत. रूजू झाल्यापासून प्रत्येक काम ते गतीने मार्गी लावत आहेत. अगदी याचप्रमाणे आता त्यांनी साठ दिवसांसाठी एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. या साठ दिवसात त्यांनी घरकुल, पादंण रस्ते, नरेगा आणि जलजिवन मिशनची कामे पुर्ण करण्यासाठी चोख नियोजन आखले आहे. बीड जिल्ह्यात तब्बल 1376 गावांमध्ये जलजीवन मिशनचे काम होणार आहे. या कामासाठी 744 कोटी रूपये खर्च होणार आहेत. सध्या जिल्ह्यात नरेगाचीही मोठी कामे सुरू आहेत, याही कामांवर कोट्यावधींचा निधी खर्च होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नरेगाच्या कामात मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा अव्वल असल्याचे समोर येत आहे. तसेच येत्या काळात बीड जिल्ह्यात तब्बल 25 हजार घरकुले पुर्ण केले जाणार आहेत. यापैकी दहा हजार घरकुले रमाई तर 15 हजार घरकुले पंतप्रधान आवास योजनेची आहेत. या घरकुलांच्या कामांचाही या साठ दिवसात निपटारा केला जाणार आहे. या कामांवर तब्बल 700 कोटी रूपये खर्च होणार आहेत. त्याप्रमाणे ग्रामीण भागासाठी महत्वाचे असणारे पादंण रस्त्यांचेही बीड जिल्ह्यात मोठे काम होणार आहे. जिल्ह्यात तब्बल 860 ठिकाणी हे रस्ते होणार आहेत. या कामांवर 240 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. ही सर्व कामे झपाट्याने मार्गी लावण्यासाठीच सीईओ शिक्षण, बांधकाम, लघुपाटबंधारे यासह अन्य विभागातील अभियंता आणि इतर अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर महत्वाची जबाबदारी टाकली आहे.  त्यातली त्यात या सर्व कामांवर बारकाईने नियंत्रण रहावे, सर्व कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी प्रत्येक तालुक्याला एक विशेष अधिकारीही नेमण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे स्वत: सीईओ, एसीईओ, प्रकल्प संचालक थेट फिल्डवर जावून सदर कामांची तपासणी आणि त्या कामांना गती देण्याचे काम करीत आहेत. सीईओंनी दैनंदिन कामकाज व विषयाबरोबर मुख्यतः   3 विषय प्राधान्याने हाती घेतले आहेत.  जल जीवन मिशन, रोजगार हमी मधील मातोश्री पाणंद रस्ते / विहीर इत्यादी आणि घरकुल या कामांचा समावेश आहे. स्वत: प्रत्येक तालुक्यामध्ये दौरे करून सीईओ सर्व कामांचा आढावा घेत आहेत.  त्याच बरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके यांना मातोश्री पाणंद रस्ते गतिमान करण्यासाठी 11 तालूक्याचे दौरे करून गती देण्यासाठी सीईओंनी सांगितले आहे. त्यानुसार मंगळवारी सोळंके यांनी बीड, पाटोदा, शिरूर, आष्टी तर बुधवारी माजलगाव, वडवणी आणि गेवराई या तालुक्यांचे दौरे केले आहेत. तर स्वत: सीईओंनी काल गेवराई आणि माजलगाव तालुक्याचा दौरा केला आहे. प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे यांनाही दौरे करून  घरकुल कामास गती देण्यास सांगितले आहे. दरम्यान स्वत: सीईओ, एसीओ आणि प्रकल्प संचालक फिल्डवर जावून कामांना गती देत असल्यामुळे हाती घेतलेली साठ दिवसांची मोहिम फत्ते झाल्याची जिल्हावासियांना प्रत्यक्ष पहायला मिळणार आहे.

Exit mobile version