बीड । दि. ०४ ।
मागील दीडदोन वर्षांमध्ये बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक आणि शरमेची बाब आहे. महिला अत्याचाराचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत व जिल्ह्यातील गुन्हेगारी, माफियाराज मोडीत काढून कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा अशा सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्या नंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक ए. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठवून काही दिवसांनी त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून आलेले पंकज देशमुख यांची खा.प्रितमताई मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. जिल्ह्यातील परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था याविषयी चर्चा करताना त्यांनी महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी,अवैध धंदे आणि माफियाराज मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सूचना दिल्या, तसेच गुन्हेगारी घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याचे ही त्यांनी सूचित केले.
नवीन येणाऱ्या अधीक्षकांना पदभार देताना ‘ओव्हर’ द्यावी
प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे आठ मे पर्यंत प्रभार असला तरी नव्याने रुजू होणाऱ्या पोलीस अधीक्षकांना जिल्ह्याच्या परिस्थिती बाबत अवगत करून दिलेल्या सूचनांची त्यांना माहिती दिली तर जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेची घडी बसवण्यात त्यांना मदत होईल.त्यामुळे पंकज देशमुख यांनी येणाऱ्या पोलीस अधीक्षकांना ओव्हर द्यावी अशी प्रतिक्रिया खा.प्रितमताई मुंडे यांनी दिली.
••••