Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीची शांतता आणि सुरक्षा धोक्यात – पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली चिंता,खून, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना गंभीर

परळी वैजनाथ ।दिनांक ०१।
गेल्या कांही महिन्यांपासून शहर व ग्रामीण भागात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना गंभीर असून परळीची शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिस आणि सत्ताधाऱ्यांचा कसलाही अंकुश यावर राहिला नाही अशी प्रतिक्रिया देत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी या घटनांकडे लक्ष वेधले आहे.

शनिवारी परळी शहरात शैलेश राजनाळे या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असला तरी हल्लेखोर मात्र पसार झाले आहेत. परवा मिरवट येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचाराची घटना घडली. दरम्यान गेल्या कांही महिन्यांपासून खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार, धमकावणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. शहरात याचा उद्रेक जास्त आहे. पोलिस व कायद्याचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. सत्ताधाऱ्यांचे देखील यावर कसलेही नियंत्रण नाही, त्यामुळे परळीची शांतता व सुरक्षा धोक्यात आली आहे.असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व सामान्य नागरिक दहशतीखाली वावरत असून हे गंभीर आणि चिंताजनक असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
••••

Exit mobile version