Site icon लोकाशा-बंब न्यूज

बेलुऱ्यापाठोपाठ परळीतही गँगरेप, परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल, दोन नराधमांच्या मुसक्या आवळल्या

परळी वैजनाथ दि २८ ( लोकाशा न्युज ) :-
गेल्या चार दिवसांपूर्वीचं बीड जिल्ह्यातील बेलुरा त्या ठिकाणच्या सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. परळी तालुक्यातील मिरवट ह्या ठिकाणी शेतात काम करत असणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेवर एकटी असल्याचा गैरफायदा घेत दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोन नराधम आरोपींच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले आहे.

या संतापजनक घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी तालुक्यातील शहरापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरवट गावातील एक पिडीत महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहते. काल पीडिता आपल्या शेतातील घरालगतच्या शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे वय ४० रा मिरवट व साजन तिडके वय ३० रा. भोगलवाडी ह्या दोन नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बळजबरीने सामूहिक बलात्कार केला. त्याचबरोबर याबाबत कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून संपवून टाकू अशी धमकीही देखील दिली.
या घटनेने भयभीत झालेल्या पीडित महिलेने सरळ परळी ग्रामीण पोलिस ठाणे गाठून ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांना भेटून आपल्या वर घडलेला सारा प्रकार सांगितला. सपोनी मारुती मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता २२ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात
३७६ (ड), ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून अवघ्या ३ तासांतच नराधम आरोपींच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. गेल्या चार दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावातील २४ वर्षीय विवाहितेवर चुलत पुतण्यासह गावातीलच चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता परळीच्या मिरवट गावात पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने, बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर मिरवट या ठिकाणच्या घटनेने अख्खा परळी तालुका हादरला असून शेतात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवणार्या महिला मजुरांचा सुरक्षेचा प्रश्न एक चिंतेची बाब बनली आहे.
घटनेचा अधिक तपास स्वतः ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे करत आहेत.

Exit mobile version